समाजसेवक डॉ शरद तेलगाने यांचा उदयगिरी कापड मार्केट गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने सत्कार
उदगीर (एल पी उगीले)
उदगीर येथील समाजसेवक तथा समाजाला दिशा देण्यासाठी प्रबोधनात्मक किर्तनकार म्हणून ख्यातनाम असलेले उदगीरच्या ओम हॉस्पिटल अँड मॅटरनिटी होम चे प्रमुख डॉ. शरदकुमार तेलगाने यांची निवड त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या उदगीर तालुका अध्यक्षपदी करण्यात आली आहे. वैचारिक समृद्धता तथा समाजसेवेचा वारसा आणि अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या जनसंपर्कातील एका ख्यातनाम डॉक्टरला राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या तालुकाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल, उदयगिरी कापड मार्केट गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार समारंभाच्या प्रसंगी श्रीनिवास पेन्सलवार, चंद्रशेखर पुणे, श्रीपतराव केंद्रे, वेंकटेश पेन्सलवार, अमर खत्री, लक्ष्मीकांत चिद्रेवार, प्रेम मोदी, बळीराम सावळे, मनोज खत्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी स्पष्ट केले की, उदगीर पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यांच्या सहकार्याच्या बळावर राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे काम निश्चितपणे उदगीर तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबवून पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास सार्थ करून दाखवणार. माझ्या आजपर्यंतच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कामांमध्ये व्यापारी बंधूंनी मोठ्या प्रमाणात साथ दिलेली आहे. अशीच साथ भविष्यातही मला मिळेल, असा मला विश्वास आहे. नागरिकांच्या सहकार्याच्या बळावरच शासनाच्या लोककल्याणकारी योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. गोरगरीब लाभार्थ्यांना लाभ झाला पाहिजे, शासनाच्या योजनेची इत्यंभूत माहिती लाभार्थ्यांना मिळाली पाहिजे. शासकीय यंत्रणा कमी पडत असेल तर त्या ठिकाणी त्या यंत्रणेचा भाग बनून राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे कार्यकर्ते काम करतील, आणि त्यासाठी आपण नवी फळी उभारू. असा विश्वासही याप्रसंगी डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केला आहे.
