पालकांनी आपल्या पाल्याच्या हरकती तिकडे लक्ष ठेवावे – पो. नि. दिलीप गाडे

0
पालकांनी आपल्या पाल्याच्या हरकती तिकडे लक्ष ठेवावे - पो. नि. दिलीप गाडे

उदगीर (एल. पी. उगिले)
उदगीर शहरातील नामांकित शाळा आणि महाविद्यालयाच्या समोर काही टुकार विद्यार्थी आणि रोड रोमिओ विद्यार्थिनींना त्रास देत असून, त्या त्रासापासून पोलीस प्रशासनाने मुलींचे संरक्षण करावे. अशा पद्धतीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीने पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला दिलेले आहे. तसेच या संदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे असेही सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याची दखल घेऊन उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी आपल्या पथकाला या गोष्टीचे गांभीर्यपूर्वक निरीक्षण करून योग्य ती कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. असे प्रकार शहरात कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयासमोर होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांचा आदेश विचारात घेऊन शहर पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने शहरातील विविध नामांकित महाविद्यालय आणि शाळा यांच्या परिसराचा अभ्यास करून विशेष पेट्रोलिंग सुरू केली आहे. या दरम्यान या परिसरात विनाकारण फिरणारे सात तरुणांना महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच याच परिसरात विद्यार्थिनीवर आपला प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने वेडी वाकडी वाहने चालवणे आणि अति गतीने वाहने चालवणे असे काही प्रकरणे आढळून आल्यामुळे 13 विद्यार्थ्यांच्या विरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये तेरा गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचना देऊन बोलावून घेऊन, आपल्या पाल्यावर विशेष लक्ष ठेवावे. अन्यथा मजा म्हणून गुन्हे करणाऱ्या पाल्यांच्या विरोधात गुन्हे नोंद झाल्यानंतर जेव्हा नोकरीची वेळ येईल, त्यावेळेस चारित्र्य पडताळणीच्या दरम्यान या गुन्ह्याची नोंद चरित्र प्रमाणपत्रावर झाल्यास त्यांना नोकऱ्या मिळणार नाही. या संदर्भात पोलीस प्रशासनाने पालकांसोबत समुपदेशन करून विद्यार्थ्यावर लक्ष ठेवावे. जेणेकरून आपल्या पाल्याच्या हातून कोणतीही चूक होणार नाही, याची जबाबदारी पालकांनी घ्यावी. असे मार्गदर्शन ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी केले आहे. पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीने मार्गदर्शन केल्यामुळे अनेक पालकांनी पोलिसांचे ऋण व्यक्त केले आहे. तसेच वेळीच मार्गदर्शन केल्यामुळे सावधगिरी बाळगायला संधी मिळते, अशी ही प्रतिक्रिया काही पालकांनी दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!