“कुलकर्ण्यांचा दवाखाना ” पुस्तकाचे लेखक डॉ संजय कुलकर्णी यांचे अनुभव कथन

0
"कुलकर्ण्यांचा दवाखाना " पुस्तकाचे लेखक डॉ संजय कुलकर्णी यांचे अनुभव कथन

तुळजापूर (प्रतिनिधी)

वर्षानुवर्ष वैद्यकीय व्यवसाय करत असताना माणसातील माणूसपण जपण्याचा प्रयत्न डॉक्टर म्हणून केलेला आहे. आणि वेगवेगळ्या रुग्णांच्या मिळालेल्या अनुभवातून कुलकर्णी यांचा दवाखाना या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. असे मनोगत प्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ञ डॉ. संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. संस्कार भारती देवगिरी प्रांत साहित्य विभागाच्या वतीने आयोजित ग्रंथ परिचय कार्यक्रमात डॉ संजय कुलकर्णी ( उदगीर ) बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्कार भारती चे प्रांत महामंत्री डॉ. जगदीश देशमुख हे होते. कार्यक्रमासाठी पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, प्रांताध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिका प्रा. स्नेहल ताई पाठक, कार्याध्यक्ष भगवान देशमुख, पूर्व अध्यक्ष भरत लोळगे, सह महामंत्री डॉ. सतीश महामुनी, संयोजक डॉ. विद्यासागर पाटणगणकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रांत नाट्यविधा संयोजक सुनीता घाटे यांच्या नात सई भागवत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष प्रा. स्नेहलताई पाठक यांनी केले. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीवर डॉ. संजय कुलकर्णी यांनी सहा पुस्तकांचे केलेले लेखन हे निश्चितच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. कोणत्याही चांगल्या कामासाठी वेळ कसा उपलब्ध होतो? हे डॉक्टरांनी दाखवून दिले आहे. असे प्रा. स्नेहल ताई पाठक यांनी सांगितले. या प्रसंगी ध्येय गीत कुणाल कुलकर्णी यांनी सादर केले, प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. गौरव जेवळीकर यांनी करून दिला. पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरटे यांनी आपल्या मनोगतामध्ये वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने संस्कार भारतीचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. साहित्य विधेने वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव कथन केलेले डॉ. संजय कुलकर्णी यांचे पुस्तक या उपक्रमासाठी निवडले आणि खूप छान चर्चा घडवून आणल्याबद्दल संयोजकाचे कौतुक केले.
या निमित्ताने पुस्तकाचे लेखक डॉ. संजय कुलकर्णी यांनी उदगीर या कर्नाटक लगत असणाऱ्या प्रदेशांमध्ये उपयोगात आणली जाणारी मराठी भाषा आणि तिचा वेगळा लेहजा त्याचबरोबर बोलीभाषेचे वेगवेगळे उपयोग आणि त्यामधून निर्माण होणारे विनोद यांची सांगड घालून उपस्थितांना आपल्या अनुभवाचे अत्यंत समृद्ध कथन केले. वैद्यकीय व्यवसायाच्या अनुषंगाने समाजाच्या असणाऱ्या अपेक्षा आणि समाजा कडून या व्यवसायाच्या बद्दल मांडल्या गेलेल्या वेगवेगळ्या कल्पना यांचा देखील उल्लेख त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये केला. दवाखाना उभा करण्याची कसरत आणि सर्व रुग्णांना सांभाळून घेऊन योग्य उपचार करण्याची डॉक्टरांचे कसब हे देखील त्यांनी शब्दबद्ध केले. लोकांच्या कल्पनेमध्ये डॉक्टर यांना दिलेले देव पण कसे अडचणीचे देखील ठरते, हे त्यांनी उदाहरणासह सांगितले. रुग्णाकडून माहिती सांगत असताना किंवा आजार कोणता आहे? याची माहिती देताना, याशिवाय सांगताना वेगवेगळ्या गमतीजमती कशा होतात आणि त्यामधून डॉक्टर कसा संदेश घेऊन पुढे उपचार करतो. उपचारादरम्यान रुग्णांना येणारे अनुभव आणि त्याच्या बोलण्यातून व्यक्त होणाऱ्या भावना यांची देखील मांडणी डॉ. संजय कुलकर्णी यांनी अत्यंत कल्पकतेने केली आहे. या अनुभवांमधूनच कुलकर्ण्यांचा दवाखाना हे पुस्तक लेखन झाले आणि पुढे यामधून अनेक पुस्तकांचे लेखन झाल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. अध्यक्षीय समारोप करीत असताना प्रदेश महामंत्री डॉ. जगदीश देशमुख यांनी वैद्यकीय व्यवसाय आणि त्यातून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी या पुस्तकाच्या रूपाने समोर आली आणि डॉ. संजय कुलकर्णी यांनी अत्यंत प्रभावीपणे या कार्यक्रमांमधून ती मांडली असे सांगितले. शेवटी संयोजक विद्यासागर पाटगणकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. अश्विनी कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!