नूतन पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांची कौतुकास्पद कामगिरी !!
शैक्षणिक संकुला जवळून तंबाखूजन्य पदार्थांच्या हद्दपारसाठी कामाला लावले सर्वच अधिकारी !!
लातूर (ॲड. एल. पी. उगीले)
कोणताही पोलीस अधिकारी नव्याने बदलून आल्यानंतर आपली भूमिका कठोर आहे, हे दाखवण्यासाठी अवैध धंद्यावर धाडसत्र चालू ठेवतात. लातूर जिल्ह्याला पोलीस अधीक्षक म्हणून अमोल तांबे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर या गोष्टीचा प्रत्यय यायला लागतोय. त्यांच्या जोडीला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून मंगेश चव्हाण हे रुजू झाल्यामुळे आणखीच कठोरपणा येईल, यात शंकाच नाही. मंगेश चव्हाण हे लातूर जिल्ह्यासाठी नवीन नाहीत. पूर्वी त्यांनी धडाकेबाज कामगिरी केलेलीच आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. आता अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर आणि त्यातही पोलीस अधीक्षक म्हणून अमोल तांबे यांच्यासारखा अधिकारी असल्यामुळे जिल्ह्याला शिस्त लागेल, अशी अपेक्षा लोक ठेवू लागले आहेत.
महाराष्ट्र शासनाने युवकांच्या आरोग्याचा विचार करून, मोठ्या प्रमाणात कर मिळत असताना देखील गुटखा आणि सुगंधित तंबाखू याच्यावर प्रतिबंध घातले आहेत. शासनाने प्रतिबंध घातले तरीही चोरट्या मार्गाने हे पदार्थ महाराष्ट्रात बिनदिक्कतपणे येतात, अनेक पान टपरी आणि दुकानातूनही सहज उपलब्ध होतात. त्या अनुषंगाने अधून मधून कारवायाही झालेल्या आहेत.
मात्र संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळेस शैक्षणिक संकुलाच्या शंभर मीटरच्या आतील अंतरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे किंवा बाळगणे हे कायद्यानुसार चुकीचे आहे, हे दाखवून देण्यासाठी या दोन्ही जांबाज अधिकाऱ्यांनी 11 जुलै रोजी सकाळी एकाच वेळी अचानकपणे लातूर जिल्ह्यातील 23 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्वच शाळा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरातील पान टपऱ्या, किराणा दुकानांची 67 विशेष पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. ज्या पान टपऱ्या व किराणा दुकानांमध्ये अवैध गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले, त्या पान टपऱ्या व किराणा दुकानावर भारतीय न्याय संहिता (COTPA Act 2003) म्हणजेच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात बंदी आणि व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियमन कायदा 2023) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. लातूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये 67 पथके तयार करून शाळा महाविद्यालयाच्या परिसरामधील अचानक छापेमारी केली, यामध्ये भारतीय न्याय संहिता अन्वये सात गुन्हे दाखल करण्यात आले असून, या सात गुन्ह्यात गुटखा व सुगंधित तंबाखू असा एकूण पाच लाख 63 हजार 517 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच COTPA Act 2003 प्रमाणे 149 कारवाया करण्यात आल्या आहेत.
सदर कारवाईदरम्यान 218 शाळांना, महाविद्यालयांना भेटी देऊन शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असलेल्या 469 पान टपऱ्या, किराणा दुकान तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई करण्याकरिता 53 अधिकारी व 245 पोलीस आमदार यांची नेमणूक करून 67 पदके तयार करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असून सदरची तपासणी मोहीम ही नियमितपणे सुरू असणार आहे. शाळा व महाविद्यालयीन परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणे खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध अधिक कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांनी केला आहे.
शालेय परिसरातील विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन आणि ते व्यसनाधीन होऊ नयेत, याची दक्षता घेत लातूर पोलिसांनी घेतलेला हा निर्णय आणि केलेली कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. यापूर्वी अशा संदर्भात अनेक वेळा बैठका झाल्या, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात ही पहिल्यांदाच कारवाई होत आहे. आणि ही मोहीम सतत चालूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे कौतुकास्पद आहे. किमान शाळा महाविद्यालयाच्या परिसरात तरी तंबाखूजन्य पदार्थ टाळले गेले तर विद्यार्थी काही प्रमाणात का होत नाही, व्यसनाधीन होण्यापासून वाचतील. शैक्षणिक संकुलाच्या जवळ असलेल्या पान टपरी आणि किराणा दुकानाच्या समोर थांबणाऱ्या, टपोरीगिरी करणाऱ्या रोड रोमिओ यांना आळा बसेल. अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. एकंदरीत जिल्हा पोलीस अधीक्षक आमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी रुजू होताच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामाजिक भान दाखवत मोठी कारवाई केल्याबद्दल जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
