ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून शिरसे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय – आ. संजय बनसोडे

0
ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून शिरसे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय - आ. संजय बनसोडे

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर सारख्या सीमावर्ती भागातील तालुक्याच्या ठिकाणावरून महाराष्ट्र पातळीवरील ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणे, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रकाशन संस्था काढून ग्रामीण भागामध्ये लेखक, कवी यांच्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देणे, हे अत्यंत महत्त्वाचे कार्य सूर्यकांत शिरसे यांनी केले आहे. गेली 35 वर्षापासून ग्रंथालय चळवळीचे प्रश्न घेऊन ते लढा लढत आहेत, त्यांनी उपस्थित केलेले अनेक प्रश्न आता महायुती सरकारकडून सुटू लागले आहेत. सूर्यकांत शिरसे यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. असे उद्गार माजी कॅबिनेट मंत्री तथा उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी काढले.
ते सूर्यकांत शिरसे यांच्या षष्ठाब्धीपुर्ती अभिवादन सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे हे होते. तर मार्गदर्शक म्हणून मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह राम मेकले हे उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियां, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, प्रा. शाम डावळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. बनसोडे म्हणाले की, ग्रामीण भागात देखील गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेला संधी मिळणे गरजेचे आहे. उदगीर परिसरातील लेखक, कवी यांचे 500 पुस्तके प्रसाद प्रकाशन ने प्रकाशित केली आहेत. याचा अर्थ या भागातही प्रतिभा आहे, हे सिद्ध होते. आणि हे सिद्ध करण्याचे मोठे काम सूर्यकांत शिरसे यांनी केले आहे. उदगीर परिसर शिक्षण पंढरी म्हणून ओळखली जाते. त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असतानाच ग्रंथालय चळवळीसाठी ही त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना ग्रंथ मित्र हा पुरस्कार दिलेला आहे. उदगीर परिसरात गाव तिथे ग्रंथालय ही संकल्पना प्रत्यक्ष राबवून गावोगावी ग्रंथालय सुरू करून वाचन संस्कृती विकसित करण्याचे काम ही शिरसे यांनी केले आहे. या कामामुळे कार्यकर्त्यांची मोठी फळी ही त्यांनी उभा केली आहे. समाजाला दिशा देण्याचे काम ग्रंथालय करत असतात. आणि त्या ग्रंथालयाला दिशा देण्याचे काम शिरसे करतात हे कौतुकास्पद आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एल पी उगिले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम मोतीपवळे यांनी केले. सत्कारमूर्ती सूर्यकांत शिरसे यांनी आभार मानत कार्यकर्त्यांनी आपल्यावर प्रचंड प्रेम केले आहे, त्यामुळेच आपण ग्रंथालय चळवळीचा लढा लढू शकलो. साठ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्वच अज्ञात अज्ञात कार्यकर्त्याचे त्यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लक्ष्मण फुलारी, चंद्रशेखर ढगे, दिनेश पाटील, रामेश्वर बिरादार, गोविंदराव पाटील, सुरेश बोडके, यशवंत कुलकर्णी, केंद्रे गुरुजी यांच्यासह उदगीर जळकोट तालुक्यातील अनेक ग्रंथालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!