पंडित जाधव यांची नायब तहसीलदार पदी पदोन्नती,भाकसखेडा गावात भव्य सत्कार
उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील मोजे भाकसखेडा (पूर्व) येथील सुपुत्र पंडित नामदेवराव जाधव यांची नायब तहसीलदार पदी पदोन्नती झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला. भाकसखेडा या गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे की, येथील सुपुत्र पंडित नामदेवराव जाधव यांची सेवाज्येष्ठतेनुसार नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाली आहे. आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत त्यांनी तलाठी पदापासून कार्य सुरू करताना प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेची तळमळ यांचा नेहमीच आदर्श ठेवला.
सामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली असून, त्यांच्या कामाची सर्वत्र प्रशंसा झाली आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल भाकसखेडा (पूर्व) येथे भव्य स्वागत व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील महिला-पुरुष, युवकांच्या उपस्थितीत त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात त्यांचे समाजासाठी आणि प्रशासनासाठी असलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.हा सत्कार सोहळा गावातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला असून, पंडित नामदेवराव जाधव यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
यावेळी भास्कर जाधव, प्रशांत जाधव, सुनिल फावडे, भरत मोरे, गफूर शेख,गुलाब पठाण, अमोल जाधव, संदीप मोरे, उस्मान पठाण, सचीन जाधव, मारोती जाधव, सत्यवान बुर्ले, ओमप्रकाश जाधव, माधव जाधव, धोंडीराम जाधव, ओमकार विळेगावे, सत्यवान फावडे, बालाजी फावडे, वसिष्ठ रायफळे, मोहद्दीन पठण,नबी पठाण यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
