औसा व भादा पोलिसांनी पकडलेल्या बीड जिल्ह्यातील दरोडेखोराकडून नऊ गुन्हे उघड, 24 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त.

0
औसा व भादा पोलिसांनी पकडलेल्या बीड जिल्ह्यातील दरोडेखोराकडून नऊ गुन्हे उघड, 24 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त.

लातूर (ॲड.एल.पी.उगिले) लातूर जिल्ह्यातील औसा व भादा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने 2 आणि 3 ऑगस्ट च्या मध्यरात्रीच्या दरम्यान रात्रीच्या गस्तीवर असताना बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला घातक शस्त्रासह दरोडाच्या तयारीत असताना ताब्यात घेतले होते. ज्यामध्ये रिहान मुस्तफा शेख (वय 20 वर्ष रा. गौतम नगर, परळी, जिल्हा बीड), अन्वर जलालखा पठाण (24 वर्ष रा. गौतम नगर, परळी, जिल्हा बीड), हाफिज मुमताजुद्दीन शेख (वय 36 वर्ष रा. आझाद नगर, परळी, जिल्हा बीड), सादिक मोहम्मद यासीन मोहम्मद (वय 44 वर्ष रा. जुना बाजार, बीड, जिल्हा बीड), फारुक नवी शेख (वय 27 वर्षे रा. बार्शी नाका, बीड) या पाच लोकांना मालवाहू लिलँड टेम्पो(क्रमांक एम एच 44 यु 32 98) मध्ये दरोडा टाकण्यासाठी उपयोगात येणारे धारदार लोखंडी शस्त्रे, काठ्या, कटावणी, लोखंडी पाईप, तीन बनावट नंबर प्लेट, ग्राइंडर मशीन, लोखंडी साखळी व इतर साहित्यसह अटक करण्यात आली होती. तर त्यांच्या सोबतचे इतर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले होते. नमूद आरोपींनी औसा, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर तसेच शेजारील राज्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले होते. फरार आरोपींच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके रवाना करण्यात आले होते.
नमूद अटक आरोपींची दहा दिवस पोलीस कोठडी मिळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, दरोडेखोरांनी लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तसेच भादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व आमदार यांची एकूण पाच पथके तयार करून त्यांना सूचना देऊन रवाना करण्यात आले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील तीन पथके सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर टोळी मध्ये आणखी एक साथीदार समीर शमशुद्दीन शेख (वय 30 वर्षे रा. मोमीनपुरा, खाजा नगर, बीड) याला पाच लाख 72 हजार रुपयांच्या विविध प्रकारच्या प्रतिबंधित गुटखा व एक आठ लाख रुपयांची कार सह ताब्यात घेण्यात आले आहे. नमूद आरोपींनी लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर तोडून चोरलेला आणि लपवून ठेवलेला विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सिगारेट, तांदूळ, साबण, गायछाप तंबाखू, गोडेतेल, काजू, बदाम इत्यादी प्रकारच्या किराणा मालाचा एकूण चार लाख रुपयांचा किराणा व सिगारेटचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एकंदरीत लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे रेणापूर, चाकूर, वाढवणा, उदगीर शहर, किनगाव येथील प्रत्येकी एक तर अहमदपूर पोलीस ठाण्यामधील चोरीच्या तीन गुन्ह्याची अशा एकूण नऊ गुन्ह्याची उकल झाली असून गुन्ह्यात चोरलेल्या व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 24 लाख 80 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल सदरच्या टोळीकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 223/ 25 कलम 331 (4), 303 (2) भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल गुन्ह्यातील एक लाख 66 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेनापुर येथील गुरन 278/ 25 कलम 331 (4), 305 (अ),3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यातील एक लाख 31 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहमदपूर पोलीस स्टेशन येथील गुरन 16/25 कलम 331 (4), 305(अ) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यातील 40 हजार 950 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर किनगाव येथील गुरन 180 /25 कलम 331 (4), 305 (अ) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यातील 46 लाख 300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अहमदपूर येथील गुरन 531 (25) कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यातील पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच वाढवणा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गुरन 185/25 कलम 331 (4), 305 (अ) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यातील चोरी केल्याचे कबूल केले आहे. तसेच देवणी, अहमदपूर आणि चाकूर येथील ही चोऱ्या केल्याचे त्यांनी कबूल केले आहे. नमूद गुन्ह्यापैकी सहा घरफोड्या, तीन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. या टोळीने लातूर जिल्ह्यात तसेच शेजारील बीड, परभणी जिल्ह्यात आणि कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातही मालमत्ता चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याप्रमाणे पुढील तपास सुरू असून आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सदरच्या टोळीतील उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तसेच पोलीस ठाणे भादाचे पथक रवाना करण्यात आले असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!