अहमदपूरमध्ये विविध मागण्यांसाठी ‘आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा’
पोलीस फ्लॅश न्यूज (गोविंद काळे) अहमदपूर तालुक्यातील प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी (दि. ११ ऑगस्ट) उपजिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा’ काढण्यात येणार आहे. युवक नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात हा मोर्चा काढला जात असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून अनेक ज्वलंत प्रश्न मांडले जाणार आहेत. यात प्रामुख्याने गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जमिनीचे पट्टे करणे, उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी देणे आणि अनेक गावांमध्ये सार्वजनिक व दलित समाजासाठी स्मशानभूमींची मागणी करणे या मागण्यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेल्या इतर प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
- निराधार, अपंग आणि परितक्त्यांसाठीचे शासकीय अनुदान नियमित सुरू करणे.
- अहमदपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांचे १७ महिन्यांपासून थकीत असलेले पगार तात्काळ देणे.
- अतिक्रमणधारकांना मिळालेल्या कबालनाम्यांची न.प. मालमत्ता रजिस्टरमध्ये नोंद करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देणे.
- शहर स्वच्छतेचे काम नियमितपणे करणे आणि शहरात निधीची समान वाटणी करणे.
- ग्रामीण रुग्णालयातील ट्रोमा केअर सेंटर आणि ब्लड स्टोरेज केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करणे.
- रमाई घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करणे.
- अहमदपूर शहरातील गरीब व बेघर लोकांसाठी ५,००० घरे मंजूर करून त्यांचे वाटप करणे.
- मौजे परचंडा, गंगाहिप्परगा, उजना, सिंदगी खुर्द, सुमठाणा यासह अनेक गावांमध्ये गायरान अतिक्रमणधारकांच्या पिकांचे पंचनामे करून नोंद घेणे.
या मोर्चासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता असून, प्रशासनाकडून यावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
