अध्यात्मिक कार्यक्रमातून धर्मनिष्ठा व आदर्श जीवनाचे मूल्य रुजवले जाते – आ. अंतापुरकर
उदगीर (प्रतिनिधी)
मानवी जीवनात आदर्श जीवन पद्धती जगण्यासाठी अध्यात्माचे अधिष्ठान असावे लागते. त्यासाठीच हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात शिवपुराण कथा सारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, ही बाब अत्यंत स्तुत्य आहे. भाविक भक्तांनी शिवचरित्रातील त्याग, धर्मनिष्ठा आणि आदर्श जीवनाचे उदाहरण आपल्यासमोर ठेवावे. यातूनच आपल्या जीवनामध्ये सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचा संदेश आपल्याला मिळू शकतो, असे उद्गार आ. जितेश अंतापुरकर यांनी व्यक्त केले. ते उदगीर शहरापासून काही अंतरावर असलेल्या वझर येतील शिवपुराण कथा उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
याप्रसंगी शिवपुराणातील कथा ह भ प गुरुदासी परमेश्वरी दीदी परभने (बिडकर) यांच्या श्रीमुखातून भाविक भक्तांना ऐकायला मिळत आहेत. अत्यंत सुरस पद्धतीने कथानकाची मांडणी परमेश्वरी दीदी करत असल्यामुळे भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने टाळ मृदुंगाच्या गजरात हर हर महादेव च्या घोषणा देऊन वातावरणामध्ये उत्साह निर्माण करत आहेत.
प्रारंभी या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीचे स्वागत कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर चे संचालक शांताराम पाटील पळणीटकर यांनी केले. आमदार जितेश अंतापुरकर यांचा सत्कार करून परिसराच्या विकासाच्या संदर्भात ग्रामस्थांनी सादर केलेले निवेदनही दिले. या सोहळ्यासाठी उपसरपंच नरसिंगराव चोरमले, श्रीराम सावळे, वामन मद्दे, सुभाष वजीरे, किरण जाधव, भागवत कुडले, राहुल जाधव, धनाजी लवटे, आनंद पांढरे, राजकुमार पांचाळ, गणपत लवटे, राहुल चोरमले, राजकुमार बारोळे, सोहेब बोरगे, उमाकांत लवटे, बाळू संगेवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी वझर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने शिवपुराणातील कथा ऐकली, व श्रावणातील या पवित्र सोहळ्याचा लाभ घेतला.
पुढे बोलताना आ. अंतापुरकर यांनी परिसराचा विकास हाच आपला ध्यास असून कोणत्याही गावाच्या विकासा साठी कसलाही निधी कमी पडणार नाही. असे आश्वासन दिले. तसेच अशा पद्धतीचा अत्यंत सुंदर आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल संयोजकाचे कौतुकही केले.
