महापुरुषांचे विचार कालसुसंगत असतात – धनंजय गुडसूरकर
उदगीर (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक – अण्णाभाऊ साठे हे महापुरुष सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जागृतीचे कार्य करणारे होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर केलेले कार्य व निर्माण केलेल्या साहित्यकृती या आजही कालसुसंगत आहेत. लोकमान्य टिळकांनी दिलेले सामाजिक व राजकीय भान आणि अण्णाभाऊ साठे यांनी दीनदलित वंचितामध्ये केलेली जनजागृती आजही महत्त्वपूर्ण आहे. महापुरूषांचे विचार हे विशिष्ट काळापुरते मर्यादित नसून ते कालसुसंगत आहेत, असे मत महाराष्ट्र साहित्य-संस्कृती मंडळ सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील दिनविशेष समिती व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के (व.म.), उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव ( क.म.) यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना गुडसूरकर म्हणाले, स्वातंत्र्य आंदोलनात टिळकांनी लेखणी व वाणीच्या माध्यमातून देशसेवेसाठी केलेली आंदोलने अजरामर आहेत तसेच अण्णाभाऊ साठे यांनी कथा – कादंबरी व लोकनाट्याच्या माध्यमातून केलेले लोकप्रबोधन आजही दिशादर्शक आहे. अण्णाभाऊंचे साहित्य आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. तत्वांसाठी जीवाची बाजी लावणारे, बंडखोरी करणारे, धाडसी, करारी व स्वाभिमानी पात्रं अण्णाभाऊंनी साहित्यातून उभी केली. यावेळी बोलताना बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, देशाला विकसित करणारा विचार महापुरुषांनी दिला तसेच सामाजिक वंचितांचा हुंकार साहित्यातून मांडण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. आर. के. मस्के यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनविशेष समिती प्रमुख डॉ. दीपक चिद्दरवार यांनी तर आभार डॉ. अर्चना मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.