सैनिकी विद्यालयात अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी) : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून विलास शिंदे , बालाजी मुस्कावाड हे उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विलास शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हंटले, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महान कार्य करणारे नेते, साहित्यिक, समाजसुधारक, लोकशाहीर म्हणून अण्णा भाऊ साठे यांना ओळखले जाते. अण्णा भाऊ साठे यांनी लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती केली. अध्यक्षिय समारोपात पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्यात कथा, कादंबरी, नाटक, पोवाडा या विविध साहित्य प्रकारात लेखन केले. त्यांचे साहित्य रशियन भाषेत अनुवादित केले. रशियन सरकारने अण्णा भाऊ साठे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मुस्कावाड यांनी केले. तर आभार साईनाथ इंगोले यांनी मानले.