जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करा – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

0
जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करा - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जुन्या प्रकल्पांची दुरुस्ती करून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच लातूर येथील बैठकीत दिल्या आहेत. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाने तातडीने पूर्ण करावी. तसेच हे प्रस्ताव विहीत मार्गाने शासनाला सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, पालकमंत्र्यांचे खासगी सचिव प्रमोद शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता तथा प्रशासक रुपाली ठोंबरे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

हाडगा व मसलगा प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्राधान्याने सादर करावा. यासोबतच जिल्ह्यातील इतरही सिंचन प्रकल्पांचा आढावा घेवून आवश्यक दुरुस्ती कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेवून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. लातूर शहराच्या २९० कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही लातूर शहर महानगरपालिकेने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

लातूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, महानगरपालिका आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी शहरातील रस्त्यांची संयुक्त पाहणी करावी. या आराखड्यात प्रत्येक मार्गनिहाय आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. यासोबतच विलासराव देशमुख मार्गाच्या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा निर्मिती करण्याची मोहीम हाती घ्यावी. पहिल्या टप्प्यात अधिक क्षेत्रफळ असलेल्या इमारतींसाठी आराखडा तयार करावा. तसेच या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठीही प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. सारथी विभागीय कार्यालय इमारत व वसतिगृह, अभ्यासिकेचे बांधकाम विहीत कालावधीत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सतर्क राहून पशुपालकांमध्ये जनजागृती करावी. जनावरांना योग्य औषधोपचार करावेत. तसेच हा प्रादुर्भाव वाढल्यास अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्यावात, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस, खरीप पेरणी, जलजीवन मिशन, लातूर विमानतळ, आरोग्य विभाग, गाव तिथे स्मशानभूमी उपक्रम, जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील विकास कामांची माहिती दिली. लातूर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून याबाबतचे प्रमाणपत्र पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकट रावलोड यांना प्रदान करण्यात आले.

‘हरीत साथी’ अॅप कार्यान्वित; लातूर जिल्ह्याचे संकेतस्थळ आता २३ भाषांमध्ये

लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण मोहिमेत होणाऱ्या वृक्ष लागवडीची नोंद करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ‘हरीत साथी’ अॅप तयार करण्यात आले आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते हे अॅप कार्यान्वित करण्यात आले.

यापूर्वी मराठी आणि इंग्रजी भाषेत असलेले लातूर जिल्हा प्रशासनाचे संकेतस्थळ आता देशात बोलल्या जाणाऱ्या विविध २३ भाषांमध्ये दिसणार आहे. भाषिणी या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून या संकेतस्थळावरील मजकूर २३ भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते हे अद्यायवत संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!