‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत अहमदपूरमध्ये बाईक रॅलीचे आयोजन
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ) स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत नगर परिषद अहमदपूरच्या वतीने शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक मंजुषा लटपटे आणि मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली यशस्वीपणे पार पडली.
मंजूषा लटपटे, प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी, उज्वला पांगरकर, तहसीलदार, पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर आणि उपमुख्याधिकारी विठ्ठल भंडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदवला.
बाईक रॅलीची सुरुवात उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीपासून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोस्ट लाईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नगरपरिषद कार्यालय, कोर्ट परिसर, एलआयसी ऑफिस, थोडगा रोड, लक्ष्मी टॉकीज, वैभव लॉज, सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्गक्रमण करत रॅली पुन्हा प्रशासकीय इमारतीजवळ समाप्त झाली.
यावेळी समारोप प्रसंगी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी सर्व नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी होऊन आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचे आवाहन केले. या रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाविषयी जनजागृती करण्यात आली.
