लाच प्रकरणी मुद्रांक विक्रेता जाळ्यात; नांदेड एसीबीची यशस्वी कारवाई

0
लाच प्रकरणी मुद्रांक विक्रेता जाळ्यात; नांदेड एसीबीची यशस्वी कारवाई

पोलीस फ्लॅश न्यूज नांदेड (गोविंद काळे) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) नांदेडने एका यशस्वी सापळा कारवाईत मुद्रांक विक्रेता अमृत श्रीरंग जगताप (वय ५६, रा. माहूर) याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. जगताप हा शासकीय नियमांचे उल्लंघन करून मुद्रांकांच्या विक्रीसाठी अधिकचे पैसे घेत होता.

​मिळालेल्या माहितीनुसार, एका ४७ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती की, अमृत जगताप १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरसाठी २० रुपये अधिक घेत आहे. सुरुवातीला एका बॉण्ड पेपरसाठी १२९ रुपये घेतल्यानंतर, तक्रारदाराला शेतकरी बचतगटासाठी १० बॉण्ड पेपरची गरज असताना जगताप याने एकूण २०० रुपये अतिरिक्त (अवास्तव लाभ) मागितले.

​या तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीने पडताळणी केली. पडताळणीत जगताप याने १० बॉण्ड पेपरसाठी १,००० रुपयांऐवजी १,२०० रुपये मागितले. तडजोडीनंतर, त्याने १५० रुपये अवास्तव लाभ म्हणून स्वीकारण्यास सहमती दर्शविली.

​१२ ऑगस्ट २०२५ रोजी, माहूर तहसील कार्यालयाच्या गेटसमोर एसीबीने सापळा रचला. ठरल्यानुसार, जगताप याने तक्रारदाराकडून बॉण्ड पेपरच्या बदल्यात १,१५० रुपये स्वीकारले. यामध्ये बॉण्ड पेपरची मूळ किंमत १,००० रुपये आणि १५० रुपये लाचेची रक्कम होती. ही रक्कम स्वीकारताच सापळा पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

​या कारवाईनंतर जगताप याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून ४,२०० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. त्याच्या माहूर येथील घराची झडती घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन माहूर येथे सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक केली जाईल.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक संजय तुंगार, आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे यांनी त्यांच्या पथकासह पार पाडली.

​नागरिकांना कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितली गेल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सअप क्रमांक ९३५९०५६८४० वर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!