वाचनातून मिळते तणावमुक्त जीवन; डॉ. विष्णू पवार यांचे प्रतिपादन
अहमदपूर ( गोविंद काळे) – मानवी जीवनात वाचनाचे महत्त्व अनमोल असून, वाचनामुळेच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो आणि त्याचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज लवकर उठून वाचन करणे आवश्यक आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. विष्णू पवार यांनी व्यक्त केले.
येथील विचार विकास मंडळाच्या महात्मा गांधी महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक महान व्यक्तींची उदाहरणे देऊन वाचनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या विचार विकास मंडळाचे अध्यक्ष किशनराव बेंडकुळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांसाठी वाचन किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. यावेळी विचारपीठावर विचार विकास मंडळाचे सहसचिव सुरेशराव देशमुख आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. एस. आर. सुळसळे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. आर. एस. जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. ए. पी. कांबळे, डॉ. के. एन. शिवलकर, डॉ. एस. आर. कराड यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
