आचार्य गुरुराज स्वामी यांच्या मौनमुक्ती सोहळ्यात मौनाचे महत्त्व विशद
अहमदपूर ( गोविंद काळे) – अनादी काळापासून मानवी जीवनात मौनशक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर आपण मौन धारण केले, तर जीवनाचा परमोच्च आनंद प्राप्त होतो, असे प्रतिपादन भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले. राष्ट्रसंत परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्ती स्थळावर २१ दिवसांच्या श्रावण मासातील तपानुष्ठानाच्या मौनमुक्ती सोहळ्यात ते बोलत होते.
आचार्य गुरुराज स्वामी म्हणाले की, मौन हे दिव्य चैतन्याचे प्रतीक आहे. मौनामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे आपल्या भावनांवर आणि विचारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. आत्मनियंत्रण, भावनिक संतुलन आणि मनाला नवीन दृष्टिकोन प्राप्त होण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी मौनाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या अखंड शिवनाम सप्ताहाच्या निमित्ताने शिव पहारी, शिवपाठ पारायण, कीर्तन आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या समारोपाच्या दिवशी, मौनमुक्ती स्थानापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर १,१११ दिव्यांचा दीपोत्सव करून गुरुमाऊलीची आरती करण्यात आली. या सोहळ्यात परिसरातील अनेक दिंड्यांनी सहभाग घेतला.
यावेळी शिवाजी जामकर यांच्या हस्ते आचार्य गुरुराज स्वामी यांची पाद्यपूजा करण्यात आली. तसेच, अन्नदाते काशीबाई होनराव आणि अण्णाराव होनराव यांनी गुरुमाऊलीचा सन्मान केला.
या कार्यक्रमाला भक्ती स्थळाचे संचालक शिवप्रसाद कोरे, मनमत पालापुरे, रजनीताई मंगलगे, हावगीप्पा देवणे महाराज, शिवा संघटनेचे दत्ताभाऊ खंकरे, निळकंठ बिराजदार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पुणे, तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, माजी नगरसेवक अभय मिरकले आणि रवीशंकर महाजन यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पवन वाले, उमाकांत हामने, संजय उस्तुर्गे, परमेश्वर वल्लमपल्ले, रतिकांत स्वामी यांच्यासह भक्ती स्थळाच्या विश्वस्त मंडळाने विशेष परिश्रम घेतले.
