लातूरच्या वेदांत माने आणि भक्ती बिरादारची राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड
अहमदपूर( गोविंद काळे ) हिंगोली येथे पार पडलेल्या २७व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय सब-ज्युनियर तलवारबाजी स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. वेदांत प्रशांत माने आणि भक्ती सिद्धेश्वर बिरादार यांनी रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे.
८ ते १० ऑगस्ट २०२५ दरम्यान हिंगोली येथील जिल्हा क्रीडा कार्यालयात महाराष्ट्र तलवारबाजी संघटना आणि हिंगोली जिल्हा तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २७ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय सब-ज्युनियर तलवारबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ दाखवत पदके पटकावली.
वेदांत प्रशांत माने याने ईपी वैयक्तिक गटात रौप्य पदक जिंकले, तर मुलींच्या गटात भक्ती सिद्धेश्वर बिरादारने देखील ईपी वैयक्तिक गटात रौप्य पदकाची कमाई केली. या दोघांच्या या यशामुळे त्यांची आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याव्यतिरिक्त, ईपी सांघिक गटात लातूरच्या खेळाडूंनी कांस्य पदके जिंकली. यात वेदांत माने, ऋषिकेश पोले, जैद खान पठाण आणि ओमराज पौळ यांचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. दत्ता गलाले, वजीरोद्दीन काजी, मोसीन शेख, रोहित गलाले आणि आकाश बनसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंच्या यशाबद्दल शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, लातूर तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अभिजित मोरे, प्रशांत माने, संतोष कदम, वैभव काजेवाड, मेहफुज खान पठाण यांच्यासह लातूरच्या सर्व क्रीडा रसिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
