अहमदपूर शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 हजार वृक्षांची लागवड

0
अहमदपूर शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 हजार वृक्षांची लागवड

​अहमदपूर ( गोविंद काळे ) भारताचा स्वातंत्र्यदिन अहमदपूर शहरात यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. “माझं अहमदपूर हरित अहमदपूर” या संकल्पनेखाली नगर परिषद, जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून शहरात 15,000 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
​”हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान 2025″ आणि “हरित लातूर अभियान” अंतर्गत ही भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद शाळेत सकाळी ९.१५ वाजता प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, आणि मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
​या मोहिमेत नगर परिषद कर्मचारी, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. जिल्हा परिषद शाळा, विमलाबाई विद्यालय आणि कुमटा कॉलनी येथील हनुमान मंदिर परिसरात ही वृक्ष लागवड करण्यात आली. यात सीताफळ, कडुलिंब, जांभूळ, चिंच, वड, पिंपळ, आवळा, अशोक, आणि गुलमोहर यांसारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे.
​लागवलेल्या झाडांच्या देखभालीसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक वृक्षाची नोंद डिजिटल ट्रॅकिंगद्वारे ठेवली जात आहे. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिक एकत्रितपणे उचलणार आहेत. या उपक्रमामुळे शहरातील हरितक्षेत्र वाढून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास, प्रदूषण नियंत्रित करण्यास आणि नागरिकांना स्वच्छ हवा मिळण्यास मदत होणार आहे.
​वृक्षलागवड ही केवळ आजची जबाबदारी नसून ती येणाऱ्या पिढ्यांसाठीचा एक अमूल्य वारसा आहे, असे आवाहन या मोहिमेत सहभागी झालेल्या मान्यवरांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!