तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ च्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शाळेतील मैदानावर वाजत गाजत गोविंदा गीत व वेशभूषेत श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी उत्सवाची माहिती सांगितली. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे, यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे, पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात बरेचशे सण साजरे केले जातात, त्यातलाच एक सण म्हणजे दही हंडी, बाकीचे सण जेवढ्या आनंदात साजरे केले जातात, तेवढ्याच आनंदात दही हंडीच्या सणाला सुद्धा उत्साह असतो. दही हंडीला महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरे केल्या जाते, तसेच भारतात इस्कॉन संस्थेच्या द्वारे सुद्धा दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केल्या जातो. अशी सविस्तर माहिती सांगितली. जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हाजेव्हा काल्याचे कीर्तन होते, तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकाला होतो. म्हणूनच त्या कीर्तनाला “काल्याचे” कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर, अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ।। असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात, व दहीहंडी फोडतात. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला, व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळविणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ, हा कृष्णास फार प्रिय होता, असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. “गोपाळकाला” हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो. काल्यातील प्रमुख घटक पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत. पोहे वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी) या दही वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्या मातृभक्तीचे प्रतीक दूध गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक ताक गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक लोणी सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीचे प्रतीक. चला तर आपण दही हंडी हा खेळ उत्सव साजरा करुया. शाळेतील विद्यार्थ्यांना गोविंदा ला घेऊन दहीहंडी फोडली. शाळेतील विद्यार्थी राधा कृष्ण, गोविंदा झाल्याने अतिशय सुंदर व मनमोहक रिंगण करून दहीहंडी साजरी केली. विद्यार्थ्याच्या आनंदात सर्व जण सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी खूपच उत्स्फूर्त पणे गोविंदा गीते सादर केली. या दहिहंडी उत्सवासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे आदी जण उपस्थित होते.
