शेतकऱ्याला न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकाराचा सन्मान
पोलीस फ्लॅश न्यूज नांदेड( गोविंद काळे ): दै. सामना वृत्तपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या एका बातमीचा मोठा गौरव नांदेड येथे करण्यात आला. अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील शेतकरी आंबादास पवार यांना बैल नसल्याने स्वतःच्या खांद्यावर जु घेऊन शेतीची अंतर मशागत करतानाची हृदयद्रावक परिस्थिती दै. सामनाचे अहमदपूर तालुका प्रतिनिधी वसंत पवार यांनी आपल्या बातमीत मांडली होती.
या बातमीमुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि आंबादास पवार यांना तातडीने मदत मिळाली, ज्यामुळे त्यांना न्याय मिळाला. या उल्लेखनीय आणि संवेदनशील पत्रकारितेबद्दल वसंत पवार यांचा नांदेड येथे दै. सामनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
दै. सामनाकडून पत्रकाराच्या कार्याचे कौतुक
या सन्मान सोहळ्यावेळी दै. सामनाचे निवासी संपादक गणेश तुळशी, पुणे आवृत्तीचे संपादक अरुण निगवेकर, महाव्यवस्थापक नितीन मोरे आणि जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर उपस्थित होते. त्यांनी वसंत पवार यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, ”वसंत पवार यांनी केवळ बातमी दिली नाही, तर एका गरजू शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे पत्रकारितेची खरी ताकद दिसून आली.” त्यांनी वसंत पवार यांना यापुढेही अशाच प्रकारे समाजातील उपेक्षित आणि गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत राहण्याचे आवाहन केले.
या सन्मानामुळे समाजातील अनेक समस्यांवर प्रकाश टाकून त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी पत्रकारिता किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
