अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शिवसेनेची मागणी

0
अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शिवसेनेची मागणी

​अहमदपूर ( गोविंद काळे ) गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अहमदपूर तालुक्यातील शेतीत मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन यांसारख्या मुख्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी शेतीतील मातीही वाहून गेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपविभागीय अधिकारी सौ. मंजूषा लटपटे यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे उपस्थित होते.
​निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, काही ठिकाणी रस्त्यांवरील पूलही वाहून गेले आहेत. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
​या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करावे आणि शेतकऱ्यांना योग्य ती मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जर या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करेल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
​या निवेदनावर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, तालुका संघटक अनिकेत फुलारी, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडिले, उपतालुका प्रमुख पद्माकर पेंढारकर, गणेश माने, उपशहर प्रमुख शिवकुमार बेद्रे आणि विभाग प्रमुख गजानन येन्ने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!