शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला बैल पोळा सण
अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी आपला लाडका सण, बैलपोळा, मोठ्या उत्साहात साजरा केला. यंदा पावसाने चांगली साथ दिली असल्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. याच आनंदात शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची विशेष पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावर्षीच्या पोळ्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना मोठ्या उत्साहात सजवले. त्यांच्या शिंगांना रंग लावून आकर्षक बनवले, गळ्यात घुंगरांच्या माळा (चंगाळी) आणि अंगावर रंगीबेरंगी झुली घातल्या. काही सधन शेतकऱ्यांनी तर बँडबाजासह वाजतगाजत आपल्या सजवलेल्या पशुधनाची शहरातून मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये भगवे फेटे बांधून वृद्ध शेतकऱ्यांसोबत तरुण शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सजवलेल्या बैलांना गावातील हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घातली.
बळीराजाची कृतज्ञता आणि उपवास : –
वर्षभर शेतीत मदत करणाऱ्या या मुक्या मित्रांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. यंदा पाऊस चांगला झाला असला तरी, सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. तरीही, शेतकऱ्यांनी आपल्या बैलांप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम कायम ठेवून हा सण आनंदाने साजरा केला.
बैलपोळ्याच्या दिवशी अनेक शेतकरी दिवसभर उपवास करतात. सायंकाळी बैलांची आणि इतर पशुधनाची विधिवत पूजा करून त्यांना पुरणपोळीचे जेवण दिल्यानंतरच शेतकरी स्वतः उपवास सोडतात. या वर्षी देखील शेतकऱ्यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळी खाऊ घातली आणि त्यानंतरच आपले जेवण करून उपवास सोडला. यामुळे, शेतकऱ्यांचा त्यांच्या बैलांशी असलेला अतूट संबंध पुन्हा एकदा दिसून आला.
