गणेश उत्सवात अंधाराचा फायदा घेऊन महिलांसोबत अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? या निगरगट नगरपालिकेला कोण वेसन घालणार?
पोलीस फ्लॅश न्यूज, अहमदपूर ( गोविंद काळे ) शहराच्या विकासाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या बाता करणाऱ्या अहमदपूर नगरपालिकेच्या कारभारावर थोडगा रोडवरील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या महत्त्वाच्या रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. १६ ऑगस्ट रोजी या समस्येवर प्रकाश टाकूनही नगरपालिकेने डोळेझाक केल्याने, आता गणेश उत्सवादरम्यानही हा रस्ता पूर्णपणे अंधारात राहणार आहे. सणासुदीच्या काळातही जर नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसेल, तर या निष्काळजीपणाला जबाबदार कोण?
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
थोडगा रोडवर अनेक कोचिंग क्लासेस असल्याने रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. रात्री आठ वाजल्यानंतर क्लासेसमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना या अंधाऱ्या रस्त्यावरूनच घरी परतावे लागते. या अंधाराचा फायदा घेऊन महिला व मुलींसोबत छेडछाडीच्या घटना वाढल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या जीवघेण्या गैरसोयीबद्दल अनेक तक्रारी करूनही नगरपालिकेने कोणताही उपाय योजलेला नाही.
गणेश उत्सवादरम्यान मोठा धोका
गणेशोत्सव जवळ आला असून, शहरातील रस्ते दिव्यांच्या रोषणाईने उजळणे अपेक्षित असताना, थोडगा रोडवर मात्र भयाण अंधार पसरलेला आहे. रात्रीच्या वेळी गर्दीत आणि अंधारात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता अधिक असते. जर या काळात महिला आणि मुलींसोबत काही गैरप्रकार घडले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? केवळ कागदावर सुरक्षा योजना आखून उपयोग नाही, प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या समस्येवर तातडीने तोडगा न काढल्यास शहराच्या लौकिकाला गालबोट लागू शकते. नगरपालिकेने तात्काळ याकडे लक्ष देऊन, थोंडगा रोडवरील पथदिवे दुरुस्त करावेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, या निगरगट नगरपालिकेला जाब विचारण्यासाठी नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागेल.
