विजयनगर तांडा येथे अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांवर रुग्णालयात उपचार
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील विजयनगर तांडा (खंडाळी) येथे वांग्याच्या भाजीत पाल पडल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली. त्यांना तात्काळ अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री ९:२० च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयनगर तांडा येथील जाधव कुटुंबाने रात्रीच्या जेवणात वांग्याची भाजी बनवली होती. जेवणानंतर कुटुंबातील सदस्य, काजल रुपेश जाधव (१७), पायल रोहित राठोड (२०), ओम रुपेश जाधव (१६), अनिता रुपेश जाधव (४०), आणि जिजाबाई काशिनाथ जाधव (७५) यांना अचानक ताप आणि उलट्या सुरू झाल्या. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जेवणामुळे विषबाधा झाल्याचे निदान झाले. नंतर, चौकशीअंती जेवण बनवताना वांग्याच्या भाजीत पाल पडल्याचे समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर भीतीचे सावट पसरले होते. परंतु, वेळीच उपचार मिळाल्याने पाचही जणांची प्रकृती आता ठणठणीत असून, ते धोक्याबाहेर आहेत.
