बहुगुणी, मानवतावादी नागरिक घडवणे ‘रयत’ची परंपरा – बी. एन. पवार

0
बहुगुणी, मानवतावादी नागरिक घडवणे 'रयत'ची परंपरा - बी. एन. पवार

वाय. सी. महाविद्यालयात गुणगौरव समारंभ अमाप उत्साहात

 *सातारा (शिवाप्पा पाटील) :* उगवत्या पिढीच्या घडणीत चांगल्या मूल्यांची रुजवात करण्याचे कार्य रयत शिक्षण संस्था सातत्याने करत आहे. विद्यार्थ्यांच्या अंतरंगातील सुप्त क्षमता उजेडात आणून बहुमुखी, बहुगुणी, सेवाभावी आणि मानवतावादी नागरिक घडवणे ही 'रयत'ची जिवंत परंपरा असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या माध्य. शिक्षणचे सहसचिव बी. एन. पवार यांनी केले. अकरावी-बारावी परीक्षांत तसेच विविध स्पर्धा परीक्षा व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत देदीप्यमान यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे गुरुवार (ता. २८) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी श्री. पवार बोलत होते. अनेक उदाहरणे देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना श्री. पवार पुढे म्हणाले की, 'शिक्षण केवळ माहितीपुरते न राहता जीवनमूल्ये जोपासणारे असावे, कारण हाच खरा 'रयत'चा संस्कार' आहे.'
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव होते. 'आजच्या काळात करिअरच्या संधी केवळ मेडिकल वा इंजिनिअरिंगपुरत्याच मर्यादित नाहीत. खाजगी क्लासेस नफेखोरीच्या जमान्यात पालकांची लयलूट करत असताना रयत शिक्षण संस्थेचा अनिवासी गुरुकुल प्रकल्प ‘ना नफा - ना तोटा’ या तत्त्वावर विद्यार्थ्यांना परवडणारे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. विवेकी दृष्टी ठेवून पालक-विद्यार्थ्यांनी जगाला समजून घेण्याचे आवाहनही प्राचार्य श्री. जाधव यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती व एक्स वायसीयन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास मध्य विभागाचे अधिकारी नवनाथ जगदाळे, सहायक विभागीय अधिकारी प्रा. एन. टी. निकम, सहा. पर्यवेक्षिका व्ही. एम. वाळवेकर, एन. ए. पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. श्री. जगदाळे, श्री. निकम यांनी सभागृहाला संबोधित करताना करिअरच्या अमाप संधी व बदलत्या जगाशी जुळवून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. दरम्यान माजी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून संस्थेप्रती कृतज्ञता दर्शवली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, गुलाबष्प देऊन पालकांसमवेत सन्मान करण्यात आला. प्रा. राजश्री जाधव यांनी कार्यक्रमाचे अचूक व नेटके नियोजन केले. प्रा. एस. पी. सोनवणे, प्रा. एस. एस. देशमुख, प्रा. सचिन मांडके, प्रा. एस. बी. खिलारे, प्रा. गिरीश गायकवाड, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. विजयकुमार मोहिते आदींसह अन्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
प्रा. शिवाप्पा पाटील, प्रा. दीपिका खंडाईत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. आर. आर. खोत यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!