पिकविमा व अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान ७ दिवसांच्या आत जमा करा – स्वप्निल अण्णा जाधव
उदगीर (एल पी उगिले) विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील पुलांवरून पाणी वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकासोबतच शेतातील माती देखील खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुग, उडीद, तुर, सोयाबीन आदी खरीप हंगामी पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहेत. हाताशी आलेले मूग-उडीद पिके तसेच नुकतीच फवारणी केलेली तुर व सोयाबीनची पिके मुसळधार पावसामुळे डोळ्यादेखत नष्ट झाली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तरीही शासन दरबारी शेतकऱ्यांची हाक ना बोंब अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . गेल्या तीन वर्षापासून ना पिकविमा मिळाला, ना शासकीय मदत मिळाली, अशी खंत शेतकऱ्यांत आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या तर घोषणा हवेतच विरल्या. त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक वमा मंजूर करावा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला तात्काळ अनुदानाचा मदतीचा हात देऊन सहकार्य करावे असे आवाहन युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी केले आहे.
या वर्षी शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप पेरणी केली होती. मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे आता पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर,ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा भरला आहे, त्यांना सरसकट १००% पिकविम्याचा लाभ मिळावा. यासाठी विमा कंपनीला त्वरित आदेश द्यावेत. सरकारने सरसकट अतिवृष्टी अनुदान मंजूर करून पुढील ७ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. अशी मागणीयुवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी शासनाकडे केली आहे.
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे.शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर कोणताही विलंब न करता सरकारने ठोस निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. अन्यथा, प्रतिवर्षाप्रमाणे शेतकऱ्यांवर अन्याय होत राहिला तर जनता नाईलाज म्हणून आक्रमक पवित्र घेऊन आंदोलनाच्या तयारीला लागेल. असा इशारा युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी दिला आहे.
