डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा – पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजी नगर (अलकनंदा मोरे)
गणेशोत्सव हा यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी डीजेमुक्त उत्सव साजरा करावा, आणि पारंपारिक वाद्यांचा वापर करून शांततेत आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले. एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात झालेल्या शांतता समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जालना मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, आ. प्रदीप जयस्वाल, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच शांततेत व उत्साहात उत्सव साजरा करावा असे पालकमंत्री शिरसाट म्हणाले,जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट तयारी केली आहे. ही आनंदाची बाब असून उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सुखद अनुभव मिळावा; यासाठी डीजेचा वापर टाळून पारंपारिक वाडा, ढोलताशे यांच्या गजरात उत्सव साजरा करावा. डीजेमुळे ध्वनीप्रदूषण वाढते, त्यामुळे डीजेमुक्त गणेशोत्सवा साठी मंडळांनी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर अमली पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले.
