तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संवाद मेळावा : अस्थिर बाजारभावावर तोडगा काढण्याची गरज
उदगीर (एल पी उगीले)
कांदा हा देशाच्या अर्थकारणाशी निगडित प्रमुख नगदी पिक असून, दरकपात, वाहतूक अडचणी, साठवणूक सुविधा नसणे व बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व बाजारपेठेचे पर्याय उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, उदगीर यांच्या वतीने “शेतकऱ्यांचा संवाद मेळावा” सहकार महर्षी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवानदादा पाटील तळेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तज्ज्ञांचा ऊहापोह
या मेळाव्यात कांद्याचे भाव कोसळण्यामागील कारणे, दलालांचे वर्चस्व, शेतमालाची थेट विक्री, निर्यात धोरण, सरकारी हस्तक्षेप यावर सविस्तर चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांना दर मिळवून देण्यासाठी साठवणूक केंद्रे, प्रक्रिया उद्योग आणि निर्यात बाजारपेठ हा पर्याय कसा प्रभावी ठरू शकतो, यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून
केदा तानाजी आहेर (नाना), नाफेड चे संचालक तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर किसन जगताप, देवळा ॲग्रोटेक चे संचालक प्रविण मेधणे,
महा स्वराज्य संचालनालय महाराष्ट्र राज्याचे राज्य संचालक अजय दराडे इत्यादी तज्ज्ञ आणि मार्गदर्शक पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती
कांद्याला स्थिर व हमीभाव मिळवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना,शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यायी बाजारपेठ,निर्यातीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या संधी,शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळविण्याची प्रक्रिया यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. सदरील कार्यक्रम उदगीर येथील भागीरथी मंगल कार्यालय डॅम रोड उदगीर येथे दिनांक पाच सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे.
आयोजकांचे आवाहन
आज कांद्याचा बाजार शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरतोय. अशा वेळी शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवे. बाजारपेठेतून योग्य तो भाव मिळवण्यासाठी या संवाद मेळाव्यात सहभागी व्हा,” असे आवाहन स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, उदगीरचे अध्यक्ष भरत भाऊ चामले, उपाध्यक्ष शंकर पाटील तळेगावकर व संचालक मंडळाने केले आहे.
