प्राचार्य घाळे यांनी उदगीरच्या शैक्षणिक परंपरेत नावलौकिक मिळवला – ना. संजय बनसोडे

प्राचार्य घाळे यांनी उदगीरच्या शैक्षणिक परंपरेत नावलौकिक मिळवला - ना. संजय बनसोडे

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर ही शिक्षण पंढरी म्हणून नावारूपाला आली, त्यामध्ये अनेकांचे मोठे योगदान आहे. पूर्वी अनेक शिक्षण महर्षींनी उदगीरचे नाव लौकिक केले. सद्यस्थितीत उदगीर येथील प्राचार्य विरभद्र घाळे यांनी ब्राईट स्टार इंग्लिश हायस्कूल च्या माध्यमातून या परिसरामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मोठे योगदान दिले आहे. प्राचार्य वीरभद्र काळे यांच्या या कार्याची दखल घेऊन देशाच्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने गुणिजन गौरव पुरस्कार देण्यात आला. ही अत्यंत अभिमानाची आणि उदगीर शहर आणि परिसरासाठी आनंदाची बाब आहे. प्राचार्य घाळे यांनी अशाच पद्धतीने आपल्या शाळेचा विकास करावा. अशा शुभेच्छा राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी दिल्या.

 ते उदगीर येथील ब्राईट स्टार हायस्कूल च्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी विश्वशांती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य वीरभद्र घाळे, सचिव प्रा.सौ. प्रेमा घाळे,कोषाध्यक्ष डॉ. भाग्यश्री घाळे, सहसचिव अजिंक्य घाळे,उपाध्यक्ष ऋतुजा घाळे, प्रमुख अतिथी म्हणून उदगीर पंचायत समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदनभैय्या बसवराज पाटील नागराळकर, श्याम डावळे, जि प सदस्य ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 याप्रसंगी ब्राइट स्टार हायस्कूलच्या परिसरात ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 पुढे बोलतांना ना. संजय बनसोडे म्हणाले की, उदगीर विधानसभा मतदार संघातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जे जे म्हणून करता येईल, ते ते मी करेन. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी लागणारी सर्व प्रकारची मदत करण्यास मी वचनबद्ध आहे. असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्ष डॉ. भाग्यश्री घाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अजिंक्य घाळे यांनी केले.

About The Author