धुरा बंधाऱ्याच्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न, आरोपी अटक
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे दिनांक 1 ऑगस्ट रोजी सतीश गणपती गुडसूरे यांचे शेत सर्वे नंबर 457, 458 येथील शेतात (रुचकी चा मळा) सोयाबीनच्या पट्टी मध्ये शेतात काम करत असताना शेतातील आरणी काढण्याच्या कारणावरून आरोपी शिवाजी ग्यानोबा पाटील (वय 70 वर्ष), बाळासाहेब शिवाजी पाटील (वय 50 वर्ष) यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन संगणमत करून शिवाजी ग्यानोबा पाटील याने त्याच्या जवळील रिवॉल्वरने जीवे मारण्याच्या उद्देशाने, फिर्यादीच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी चुकल्याने दुसरी गोळी झाडली. ही गोळी फिर्यादीचा भाऊ रमेश गणपती गुडसुरे (वय 35 वर्ष) यास पाठीमागे कमरेच्या वर गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला. सतीश गणपती गुडसुरे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावरून गुरनं. 321 /21 कलम 307, 504, 506, 34 भारतीय दंड विधान संहिता सह सहकलम 3/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांना घटनेच्या संदर्भात माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक पाठविण्यात आले. आरोपी क्रमांक एक शिवाजी ग्यानोबा पाटील यास नाईक चौक उदगीर येथून ताब्यात घेण्यात आले. तर दुसरा आरोपी याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्यासह तपास पथक रवाना करण्यात आले.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कमलनगर जिल्हा बिदर कर्नाटक येथून बाळासाहेब शिवाजी पाटील यास ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरलेले रिवाल्वर पोलिसांनी जप्त केले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जॉन बेन, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी भेट देऊन तातडीने कारवाई केली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सपोनि घारगे हे करत आहेत.