शहरातील भटके कुत्र्यावर निर्बंध घाला अन्यथा मुख्याधिकारी यांच्या दालनात कुत्रे सोडणार – प्रेम तोगरे

0
शहरातील भटके कुत्र्यावर निर्बंध घाला अन्यथा मुख्याधिकारी यांच्या दालनात कुत्रे सोडणार - प्रेम तोगरे

उदगीर [एल पी उगिले] उदगीर शहर परिसरात सध्या भटक्या कुत्र्याचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. शहरातील विविध भागांमध्ये हे भटके कुत्रे लोकांना चावा घेत आहेत. परिणामी, सामान्य रुग्णालयात दररोज १५ ते २० नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्याच्या उपचारासाठी तसेच रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी यावे लागत आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी व्यायामासाठी, कामासाठी किंवा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना या भटक्या कुत्र्याचा सामना करावा लागत आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवसांत अनेकांना चावा घेतल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात अचानक वाढलेल्या भटक्या कुत्र्याच्या संख्येमुळे मुख्य रस्ते, बाजारपेठा, डंपिंग ग्राउंड, रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर, शाळा, महाविद्यालये, नगर परिषद इमारत परिसरात मोठ्या प्रमाणावर कुत्र्याच्या टोळ्या फिरताना दिसत आहेत. सर्वत्र भटक्या कुत्र्याचा वावर वाढल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. रात्री उशिरा येणाऱ्या नागरिकांना भटके कुत्रे लक्ष्य करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, फिरायला जाणाऱ्या नागरिकांना तसेच लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा लहान शाळकरी विद्यार्थ्यांचा कुत्र्यांकडून पाठलाग केला जात असल्यामुळे, पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उदगीर शहरातील सर्व भागातील भटक्या कुत्र्यावर निर्बंध घालण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी अन्यथा २२/०९/२०२५ रोजी कार्यालयासमोर तीव्र असे निदर्शने करून उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात भटके कुत्रे सोडण्यात येईल असा इशारा प्रेम तोगरे यांनी दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!