शेतातील वाटेवरून वाद: दोघांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
शेतातील वाटेवरून वाद: दोघांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

​अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील हिप्पळगाव येथे शेतातील वाटेवरून झालेल्या वादातून दोघांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कौस्तुभ दिलीप गादेवार यांच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

​घटनेची माहिती अशी की, हिप्पळगाव येथील रहिवासी कौस्तुभ गादेवार (वय ३१) हे ९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतात कापसाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी, त्यांचे शेजारी रामकिशन मोरे आणि वैजनाथ रामकिशन मोरे हे दुसऱ्या रस्त्याचा वापर न करता त्यांच्या कापसाच्या शेतातून बैल घेऊन जात होते.

​गादेवार यांनी त्यांना असे का करत आहात, अशी विचारणा केली असता, दोघांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी वैजनाथ मोरे यांनी गादेवार यांना दाबून धरले, तर रामकिशन मोरेने त्याच्या हातातील काठीने त्यांच्या डाव्या पायावर मारहाण केली. गादेवार खाली पडल्यानंतर दोघांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “आम्ही येथूनच जाणार, तुला जे करायचे आहे ते कर,” असे म्हणत त्यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली.

​या घटनेनंतर, गादेवार यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत रामकिशन मोरे आणि वैजनाथ रामकिशन मोरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिरप्पा धोंडीबा भुसनुर करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!