महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बगळाकार प्रसाद कुमठेकरांचा सत्कार
उदगीर – महाराष्ट्र उदयगिरी
महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने “लेखक आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत बगळाकार प्रसाद कुमठेकर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. नुकताच त्यांना बी. रघुनाथ साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. प्रसाद कुमठेकर हे मराठी साहित्यातील सृजनशील लेखक असून उदगिरी बोलीतील “बगळा” ही कादंबरी विशेष लोकप्रिय ठरली आहे. चिंतामण प्रसाद या पात्राच्या जीवनातून सामाजिक, कौटुंबिक ताणतणाव व बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारी ही कादंबरी महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली आहे. त्यांच्या “इत्तर गोष्टी” या कथासंग्रहात मानवी आयुष्याच्या अपूर्णता आणि अर्थपूर्णतेच्या नात्याचा शोध घेतलेला आहे. सत्कार प्रसंगी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी कुमठेकरांच्या लेखन वैशिष्ट्यांचा परामर्श घेताना म्हटले की, “झऱ्याने जसे स्वाभाविकपणे वाहते तसेच त्यांचे लेखन सहजसुंदर आहे. किती लिहिले हे महत्त्वाचे नाही, तर काय लिहिले हे महत्त्वाचे आहे. काय व कसे लिहावे या दोन्ही परीक्षेत ते यशस्वी ठरले आहेत. आमचे माजी विद्यार्थी म्हणून त्यांचा अभिमान वाटतो.” शाल, ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. उत्तरपर भाषणात कुमठेकर यांनी महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख दीपक चिद्दरवार यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. ए. पी. मोरे यांनी केले. या प्रसंगी डॉ. बी. आर. दहिफळे, डॉ. के. एस. भदाडे, प्रा. गोविंद खराबे, डॉ. हरिदास भोईवार, डॉ. राहुल आलापुरे, प्रा. गौरव जेवळीकर, ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार, ज्योतीराज साळुंखे यांच्यासह मराठी वाङ्मय मंडळाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
