‘खोल उन्हातली गर्द सावली’चा प्रकाशन समारंभ संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे)
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी लिहिलेल्या ‘खोल उन्हातली गर्द सावली’ या कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या बाबत अधिक माहिती अशी की, येथील महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, ग्लोबल संस्कृत फोरम, नवी दिल्ली आणि नवी नंदी फाउंडेशन, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. ‘भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृत साहित्य जीवनशैलीसाठी मार्गदर्शन’ या विषयावर आयोजित केलेल्या या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्यात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या ‘खोल उन्हातली गर्द सावली’ या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत, ‘ विचारशालाका’ चे संपादक, तथा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.टी. शिंदे हे होते, तर विचारपीठावर बीजभाषक डॉ. के. वरलक्ष्मी (उपसंचालक, संस्कृत अकादमी, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद), डॉ. अरुण चव्हाण (सदस्य, संस्कृत अभ्यास मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर), संयोजक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी, चर्चासत्राचे समन्वयक डॉ. प्रशांत बिरादार, सहसमन्वयक डॉ. सीमा उप्पलवार, प्रा. किशोर बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुनीलदत्त गवरे लिखित ‘कारणकार्य सिद्धांत’, डॉ. प्रशांत बिरादार आणि डॉ. सीमा उप्पलवार संपादित ‘भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृत साहित्य: जीवनशैलीसाठी मार्गदर्शन’ या शोधग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
” प्राचार्य डॉ. वसंत बिरादार लिखित ‘ खोल उन्हातली गर्द सावली’ ही कादंबरी म्हणजे विमुक्त भटक्यांच्या शीलसंपन्न, फिरस्ती जीवनाची संघर्ष गाथा आहे.
ही पालावरची माणसं आर्थिकदृष्ट्या मागास असतील, मात्र त्यांच्याकडे वैचारिक दारिद्र्य नाही. विचाराने ती शहरी, नागरी माणसांपेक्षा काकणभर सरसच आहेत. या कादंबरीतील ‘नंदा’ ही अशीच एक विमुक्त भटक्या जात समूहातील क्रांतिकारी, बंडखोर, शीलसंपन्न नायिका..!
तिच्यावर गावगुंडांकडून अत्याचार होतो. तिच्या कुटुंबाची धुळधाण होते. पालावरचं अज्ञान आणि दारिद्र्य कायमचं दूर करण्यासाठी एक शाळा सुरू करण्याचं ती स्वप्न पाहते. मात्र गावगुंडांकडून शाळेचे बांधकाम थांबवलं जातं. मास्तरला संपवलं जातं. नंदाचं आयुष्य देशोधडीला लागतं. तेव्हा ती आपले दुःख एका पत्रकारासमोर व्यक्त करते. त्या पत्रकाराने तिच्या दुःखाची लिहिलेली गाथा म्हणजेच खोल उन्हातली गर्द सावली ही कादंबरी होय..!” असे गौरवोद्गार या कादंबरी बद्दल मान्यवरांनी काढले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्था कार्यरत असून, किसान शिक्षण प्रसारक मंडळ ही सर्वार्थाने लौकिकास पात्र ठरलेली संस्था आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ध्येयाने प्रेरित झालेली ही संस्था गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, वंचितांच्या मुलांना गुणवत्तायुक्त दर्जेदार शिक्षण देण्याचे ऐतिहासिक कार्य करते. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनात परिपूर्णता आणण्यासाठी विविध उपक्रम राबवायला आम्हाला प्रेरित करते, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले. सूत्रसंचालन ह. भ. प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले तर शेवटी सर्वांचे आभार सहसमन्वयक डॉ. सीमा उप्पलवार यांनी मानले. यावेळी शंभर पेक्षा अधिक शोधनिबंध लेखक, प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते.
