’वाङ्मय मंडळातून घडतो उद्याचा साहित्यिक’ – विलास सिंदगीकर
अहमदपूर ( गोविंद काळे): महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. वाङ्मय मंडळ हे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे आणि याच व्यासपीठातून भविष्यातील साहित्यिक घडतात, असे मत सुप्रसिद्ध कथाकार आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर यांनी व्यक्त केले.
येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे आयोजित मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सिंदगीकर यांनी आपल्या भाषणात लेखन आणि वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ‘भाषा ही संस्कृतीची जननी आहे आणि माणसाने भाषिकदृष्ट्या संपन्न आणि श्रीमंत असावे’, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी ‘भाकरीचे झाड’ ही आदिवासी जीवनावर आधारित कथा आणि ‘देवकामाईची शाळा’ ही अंधश्रद्धेवर प्रहार करणारी कथा अभिनयासह सादर केली.
या कार्यक्रमाला विचार विकास मंडळाचे सहसचिव सुरेशराव देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, मराठी विभाग प्रमुख डॉ. ए. पी. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली आणि त्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. व्ही. नरवाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. यादव सूर्यवंशी यांनी केले आणि आभार प्रा. संदीप मुसळे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.
