कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान पेलण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक -प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील
अहमदपूर, ( गोविंद काळे )
सध्याच्या काळामध्ये विज्ञानाने विविध क्षेत्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, वाचन संस्कृती जोपासून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्यात निर्माण होणारे आव्हान पेलण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन मराठी साहित्याचे जेष्ठ समीक्षक तथा कादंबरीकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बी.ए. प्रथम वर्षातील नवप्रवेशित विद्यार्थी स्वागत कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी किसान मंचावर उपप्राचार्य प्रो.डॉ. दुर्गादास चौधरी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. किरण गुट्टे, कार्यक्रमाचे संयोजक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पेन व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवावा. तसेच व्यक्ती हीच अभिव्यक्त होत असते याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कला गुणांचा आविष्कार घडवून आपल्यामधील कवी, लेखक, वैज्ञानिक, समाजसेवक तसेच संघटना कौशल्यातून आदर्श राजकारणी व देशाचा आदर्श नागरिक घडविण्याचे महत्त्वाचे माध्यम महाविद्यालये असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून आपले जीवन उज्वल करावे, असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले तर सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ . सतीश ससाणे यांनी व आभार भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एन. माने यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
