मनसेची लातुरात निदर्शने, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

0
मनसेची लातुरात निदर्शने, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

​लातूर ( गोविंद काळे ) लातूर जिल्ह्याला ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. ‘ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा खुर्च्या खाली करा’ अशा घोषणांनी मनसे कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून विविध मागण्या करण्यात आल्या.
​मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. निवेदनात म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जवळपास ५० लाख हेक्टरहून अधिक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, भुईमूग, मका, ज्वारी, भाजीपाला आणि फळपिके यांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे काही लोक आणि गुरेही दगावली आहेत. तसेच, पुरामुळे नदीकाठची जमीन खरडून गेली आहे आणि शेती अवजारेही वाहून गेली आहेत.
​शासनाने NDRF च्या निकषांनुसार जाहीर केलेली मदत अपुरी असल्याचे मनसेने म्हटले आहे. सध्या जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टरी ८,५०० रुपये, बागायत पिकांसाठी १७,००० रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रुपये मदत जाहीर झाली आहे. ही मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत तोकडी असून, ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
​या आंदोलनातून मनसेने केलेल्या प्रमुख मागण्या:
​शेतकऱ्यांना नुकसान भरपाई:
​जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टरी १ लाख रुपये
​बागायत पिकांसाठी १.५ लाख रुपये
​फळबागांसाठी (बहुवार्षिक पिके) २ लाख रुपये
​इतर मागण्या:
​मनुष्यहानी झालेल्या कुटुंबांना १० लाख रुपये मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी.
​मृत जनावरांसाठी (म्हैस, बैल, गाय, घोडा) प्रति जनावर १ लाख रुपये मदत.
​जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकरी १ लाख रुपये मदत.
​घराची पडझड झालेल्यांना घरकुल योजनेतून पक्के घर.
​या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, शिवकुमार नगराळे यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!