अहमदपूरमध्ये ‘नमो उद्यान’ साकारणार, १ कोटी रुपयांचा निधी मंजूर
अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर शहरातील नागरिकांना आता लवकरच एक सुंदर आणि अत्याधुनिक उद्यान मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महायुती सरकारने अहमदपूर नगर परिषदेसाठी ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या उद्यानामुळे शहरवासियांना मनोरंजन, विश्रांती आणि आरोग्यदायी वातावरणासाठी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
राज्याचे सहकार मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे उद्यान सर्व वयोगटातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले जाईल. यामध्ये लहान मुलांसाठी विविध खेळणी, तरुणांसाठी जॉगिंग ट्रॅक आणि व्यायाम करण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध असतील. या उद्यानामुळे शहरवासियांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होईल, अशी अपेक्षा आहे.
या निधी मंजुरीबद्दल मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत. लवकरच या उद्यानाच्या कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. अहमदपूर शहरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, हे उद्यान शहराच्या सौंदर्यात भर घालेल आणि नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनेल, अशी भावना व्यक्त केली आहे.
