सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा ‘रोटरी भूषण पुरस्कार २०२५’ ने सन्मान
अहमदपूर: ( गोविंद काळे) : सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना ‘रोटरी भूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अहमदपूरच्या वतीने २१ सप्टेंबर २०२५ रोजी किलबिल नॅशनल स्कूल येथे एका विशेष कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना बाबासाहेब पाटील यांनी रोटरी क्लबला ‘घरासारखी संस्था’ संबोधून हा सन्मान आपल्यासाठी खूप मोलाचा असल्याचे सांगितले. रोटरीच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत ते म्हणाले, “रोटरी हे केवळ संस्थेचे नाव नाही, तर सेवाभावाचे उत्तम उदाहरण आहे. अहमदपूरच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी मी यापूर्वीही कार्यरत होतो आणि यापुढेही माझा पाठिंबा कायम राहील.”
या कार्यक्रमात रोटरीचे ज्येष्ठ सदस्य महेंद्र खंडागळे यांनी बाबासाहेब पाटील यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रोटरीचे अध्यक्ष कपिल बिरादार यांनी काम पाहिले. या प्रसंगी बबनराव ढोकाडे (गटशिक्षणाधिकारी, पं.स. अहमदपूर), रो. चंद्रशेखर मुळे (सहाय्यक प्रांतपाल, रोटरी), नरसिंग चिलकावार, शिवानंद हिंगणे, आणि धीरेंद्र ढेले यांची उपस्थिती होती.
रोटरी क्लबच्या उपक्रमांची माहिती अध्यक्ष कपिल बिरादार यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल चवळे यांनी केले, तर रो. ज्ञानोबा भोसले यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी आणि किलबिल नॅशनल स्कूल परिवाराने विशेष परिश्रम घेतले.
