ताणतणावरहित आरोग्यदायी जीवनासाठी रानभाज्यांचे सेवन आवश्यक – कृषी अधिकारी अशोक सोळंके

0
ताणतणावरहित आरोग्यदायी जीवनासाठी रानभाज्यांचे सेवन आवश्यक - कृषी अधिकारी अशोक सोळंके

महात्मा फुले महाविद्यालयाने घेतला आगळावेगळा रानभाजी महोत्सव..!

अहमदपूर ( गोविंद काळे )
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस ताणतणावाने ग्रस्त असून, रसायन मिश्रित भाजीपाल्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे ताणतणाव वाढत असून तणावरहित आरोग्यदायी जीवनासाठी सर्वांनी रानभाज्यांचे सेवन करावे, असे आवाहन येथील उप तालुका कृषी अधिकारी अशोक साळुंखे यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सव व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या बाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक, कादंबरीकार तथा ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या दूरदृष्टीतून या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील, डॉ. सचिन गर्जे उपस्थित होते.
महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या रानभाजी महोत्सवात तरवटा, गाढव काटा, गोखरू, तोंडले, वाघाटे, पटडी, कद्दू, तांदूळजा, दगडी शेपू, शेपू, चिंचेचा चिगोर, पाथरीची भाजी, बरवड्याची भाजी, कुंडलिका, चवळी, कर्टुला, गवार, बीज, उंबराच्या दोड्या, गवारी, अंबाडी, मटकी, मूग, खीरा, काकडी, करडीची भाजी, वालाच्या शेंगा, हिरवी मिरची, शिमला मिरची, ढोबळी मिरची, पोपटी मिरची, भेंडी, मेथी, शेवग्याच्या शेंगा, कांद्याची पात, फुलगोबी, पानगोबी , बटाटा, वांगे, देव डांगर, पडवळ, काकडी, दोडका, कडीपत्ता, पडची शेंग, गुळवेल, कारले, रानकारले, हिरवे कारले, हिरवी केळी, कवट, चमकुरा, राजगिरा, शेवगा, गरज फळ, सरकंद, मुळा, पालक, गुंज फांजीची भाजी, मुळाची भाजी इत्यादी ५८ प्रकारच्या भाज्या ठेवण्यात आल्या होत्या.
यावेळी पुढे बोलताना अशोक शिंदे म्हणाले की, शहरी विषयुक्त माझ्यापेक्षा ग्रामीण भागातील रानावनातील रानभाज्यांना प्राधान्य दिले पाहिजे. रानभाज्यामुळे फॅट वाढत नाही आणि त्यामुळे माणूस आजारी पडत नाही असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आपली ग्रामीण संस्कृती खऱ्या अर्थाने महान असून, या संस्कृतीने आयुर्वेदाच्या ही आधी मानवी जीवनाला आकार दिला असून, विद्यार्थ्यांनी आपल्या निसर्ग संस्कृतीचा अभ्यास करावा तसेच नैसर्गिक सत्व असलेले खाद्यपदार्थ खाऊन आपली बुद्धिमत्ता तेच करावी आणि विद्यापीठांमध्ये आपली बौद्धिक चमक दाखवावी गोल्ड मेडल मिळवावे असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश चौकटे यांनी संपूर्ण रानभाज्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी समन्वयक उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन भूगोल विभागाचे प्रमुख कवी डॉ. दिगंबर माने यांनी केले तर आभार डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!