स्वच्छ शहराचा देखावा, वास्तवात दुर्गंधीचा ठराव’, लाखो खर्चून बांधलेले शौचालय बंद; प्रशासनाच्या बेफिकिरीवर नागरिकांचा संताप

0
स्वच्छ शहराचा देखावा, वास्तवात दुर्गंधीचा ठराव', लाखो खर्चून बांधलेले शौचालय बंद; प्रशासनाच्या बेफिकिरीवर नागरिकांचा संताप

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर ( गोविंद काळे): स्वातंत्र्याची ७८ वर्षे उलटूनही अहमदपूर शहरातील नागरिक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे शहरातील प्रमुख ठिकाणी, विशेषतः आंबेडकर चौकात, लाखो रुपये खर्चून बांधलेले सार्वजनिक शौचालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. शेजारील एकमेव मुतारीतही घाणीचे साम्राज्य पसरले आहे, ज्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांचे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘स्वच्छ शहर’चे पोकळ नारे देणाऱ्या प्रशासनाने या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.

​लाखो रुपये पाण्यात, नागरिकांची परवड

​शहरातील मुख्य रस्त्यावर आणि वर्दळीच्या आंबेडकर चौकात असणारे हे शौचालय लाखो रुपये खर्च करून बांधले गेले, परंतु त्याचा वापर नागरिकांना करता येत नाही. हे शौचालय बांधण्यामागचा उद्देशच नगरपालिकेने विफल केला आहे. पैसा खर्च करूनही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नैसर्गिक विधींसाठी योग्य जागा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठी गैरसोय होत आहे, तर व्यापाऱ्यांना दिवसभर लघवी दाबून ठेवावी लागते, ज्यामुळे त्यांना मूत्रपिंडाचे गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे.

​दुर्गंधीने आरोग्य धोक्यात, प्रशासन झोपलेय का?

​बंद शौचालयाच्या शेजारी असलेली एकमेव मुतारी वापरासाठी खुली असली तरी, तिथे प्रचंड अस्वच्छता आहे. घाणीचे ढिगारे आणि दुर्गंधीमुळे आसपासच्या वातावरणात विषारी गॅस जमा होत असल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. या दुर्गंधीमुळे त्वचेचे, श्वसनाचे आणि इतर गंभीर आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

​अहमदपूर नगरपालिका नेमके कशासाठी काम करते, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका बाजूला ‘स्वच्छ भारत अभियान’ यशस्वी झाल्याचे दावे केले जातात, तर दुसऱ्या बाजूला शहराच्या हृदयस्थानी असलेल्या चौकात ही दयनीय अवस्था आहे. ही गोष्ट प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि दुर्लक्ष स्पष्टपणे दर्शवते.

​या गंभीर बाबीची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन, बंद असलेले शौचालय तातडीने सुरू करावे आणि त्याची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी नागरिक करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!