संपूर्ण कर्जमाफीच शेतकऱ्यांवरील संकट दुर करू शकेल – विवेक जाधव
उदगीर (एल पी उगिले)
लातूर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा गंभीर संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा आर्थिक हिशोब पूर्णपणे बिघडला आहे. तूर, सोयाबीन पिके नष्ट झाली असून हजारो शेतकऱ्यांचा जगण्याचा आधार धोक्यात आला आहे. सोयाबीन मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्यामुळे व शेतीत पाणी साचल्यामुळे इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत; पीक नष्ट झाल्यामुळे ते आपले कर्ज परतफेडू शकत नाहीत. रस्त्यावरील पूल आणि शेतीला लागणारी मूलभूत सुविधा पाण्याने वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद तसेच आमदार अमित देशमुख यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील पाहणी केल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. शेतकऱ्यांच्या अडचणी थेट अनुभवताना ही खरी स्थिती स्पष्ट झाली आहे. सरकारची निष्क्रियता हृदयद्रावक आहे. सरकारी यंत्रणा फक्त आकडेवारीवर विश्वास ठेवून निर्णय घेते; प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा त्रास लक्षात घेतला जात नाही. अनेक शेतकरी आर्थिक कर्जामुळे मानसिक त्रास घेत आहेत, काहींनी तर आत्महत्येपर्यंतचा विचार केला आहे. अशी खंत युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विवेक पंडितराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,युवक काँग्रेस, उदगीर तालुक्याच्या वतीने आम्ही स्पष्टपणे सांगतो की, संपूर्ण शेतकरी कर्जमाफी ही एक तातडीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली ढकलणे ही कोणत्याही सभ्य सरकारची जबाबदारी नाही. अतिवृष्टीमुळे नष्ट झालेल्या पिकाचे नुकसान हेक्टरी ५०,०००/- रुपयांप्रमाणे द्यावे. आर्थिक मदत योजनांचा सरलीकरण करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व प्रभावित शेतकरी त्वरित मदत मिळवू शकतील. शासकीय यंत्रणा जमीनीवर उतरण्याची गरज आहे; आकडेवारी पेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या पाहिजेत.
शेतकरी समाज हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. परंतु सरकारची उदासीनता आणि गैरसोयमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या जीवावरचा धोका आणि आर्थिक बोझा दूर करण्यासाठी गुंठ्याला ८५ रुपये नाही, तर संपूर्ण कर्जमाफी जाहीर करणे ही तातडीची गरज आहे. असेही विवेक पंडितराव जाधव यांनी व्यक्त केले आहे.
