जिल्हा बँकेचा पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव अखेर मागे,भरत चामले यांच्या पाठपुराव्याला यश
उदगीर(एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पोटनियमामधील दुरुस्ती प्रस्ताव अखेर मागे घेण्यात आला आहे. स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी व सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पोटनियम दुरुस्ती प्रस्तावामुळे जिल्ह्यातील विविध खरेदी विक्री संघ, पतसंस्था, साखर कारखाने, दुग्ध संघ व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या सभासदत्वाबाबत गोंधळ निर्माण होणार होता. या प्रस्तावामुळे सहकार क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर भरत चामले यांनी सततचा पाठपुरावा करत राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे व आ. संजय बनसोडे यांच्याकडेही या विरोधात मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने अखेर हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला.
भरत चामले यांनी सांगितले की, “या प्रस्तावामुळे शेतकरी व सभासदांचे हितसंबंध धोक्यात येणार होते. लहान संस्था नामशेष होतील, कर्ज वितरणात अडचणी येतील, आणि सभासदत्वाबाबत गोंधळ निर्माण होईल. त्यामुळे आम्ही ठामपणे या विरोधात उभे राहिलो. अखेर संचालक मंडळाने शेतकरी हिताचा निर्णय घेतला.”या प्रस्तावामध्ये खरेदी विक्री संघ, पतसंस्था, साखर कारखाने, दुग्ध संघ व बाजार समित्या यांचे स्वतंत्र सभासदत्व बाद करून एकत्रित मोठ्या संस्थेला सभासद करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत छोट्या संस्था व त्यांचे प्रतिनिधी बाजूला पडले असते. यामुळे प्रस्तावाचा सर्वत्र निषेध करण्यात आला होता.
संचालक मंडळाने हा प्रस्ताव मागे घेतल्यामुळे आता जिल्ह्यातील सहकारी संस्था व सभासदांना दिलासा मिळाला असून सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे. भरत चामले यांच्या सातत्य पूर्ण भूमिकेचे व पाठपुराव्याचे सहकार क्षेत्रात कौतुक होत आहे.
