‘प्रगती’ पथावरील पूल वारंवार पाण्याखाली; उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी

0
'प्रगती' पथावरील पूल वारंवार पाण्याखाली; उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर: ( गोविंद काळे) अहमदपूर ते खंडाळी मार्गावर शेनकुड येथील मन्याड नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असले तरी, गेल्या दोन महिन्यांत या पुलाने निर्माण केलेल्या चिंतेने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे. मुसळधार पावसामुळे मन्याड नदीला आलेल्या पुरात हा प्रगतीपथावर असलेला नवीन पूल तीन वेळा पाण्याखाली गेल्याची घटना घडली आहे.

​या वारंवारच्या घटनेमुळे नवीन पुलाच्या उंचीवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. नदीचे पात्र मोठे असूनही पुलाची उंची अपेक्षेप्रमाणे का ठेवण्यात आली नाही, असा सवाल परिसरातील सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत. पूरस्थितीत पूल पाण्याखाली जात असल्याने भविष्यात या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची आणि प्रवाशांना नाहक त्रास होण्याची भीती व्यक्त होत आहे.

​वारंवार पूल जलमय होत असल्यामुळे, आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी आता या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संबंधीत बांधकाम विभाग आणि प्रशासनाने या पुलाच्या बांधकामाची गंभीर दखल घेऊन, तातडीने पुलाची उंची वाढवावी अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

​नदीचे पाणी पातळी वाढत असताना, हा नवीन पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आणि टिकाऊ ठरावा यासाठी उंची वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने नागरिकांच्या मागणीचा विचार करून, या महत्त्वाच्या मार्गावरील पुलाच्या त्रुटी दूर करून तो दर्जेदार आणि सुरक्षित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा, पावसाळ्यातील प्रत्येक मोठ्या पुरात हा पूल नागरिकांच्या अडचणीत भरच टाकत राहील.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!