सहकार मंत्र्यांची तत्परता! चिलखा येथे अतिवृष्टीत अडकलेल्या तीन मजुरांची बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सुटका
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ) राज्याचे सहकार मंत्री नामदार श बाबासाहेब पाटील यांच्या तत्परतेमुळे आणि थेट सहभागामुळे अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अतिवृष्टीमुळे अडकलेल्या तीन मजुरांना जीवनदान मिळाले आहे. पहाटे पाच वाजल्यापासून संकटात सापडलेल्या या मजुरांची प्रशासनाच्या मदतीने आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत सुखरूप सुटका करण्यात आली.
चिलखा येथे तीन मजूर अतिवृष्टीच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळताच, सहकार मंत्री पाटील यांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने जिल्हा प्रशासन सक्रिय केले. त्यांनी त्वरित जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्याशी संपर्क साधून बचाव कार्यासाठी एनडीआरएफ (NDRF) टीमला घटनास्थळी रवाना करण्याचे निर्देश दिले.
विशेष म्हणजे, केवळ निर्देश देऊन ते थांबले नाहीत. अडकलेल्या मजुरांना दिलासा देण्यासाठी आणि बचाव कार्यावर थेट लक्ष ठेवण्यासाठी मंत्री महोदय स्वतः चिलखा येथे पोहोचले. मजूर सुखरूप बाहेर निघेपर्यंत ते घटनास्थळी उपस्थित होते. मंत्र्यांच्या या व्यक्तिगत पुढाकारामुळे बचाव कार्याला गती मिळाली आणि प्रशासनाच्या मदतीने अडकलेल्या चारही मजुरांची सुखरूप सुटका झाली.
या बचाव मोहिमेदरम्यान उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, पोलीस निरीक्षक भुसनर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. संकटकाळात मंत्र्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि तातडीच्या निर्णयामुळे मोठी हानी टळली, याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
