अहमदपूरमध्ये अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी; माजी नगरसेवक बालाजी पाटील आगलावे यांनी तातडीने केली मदत!
अहमदपूर ( गोविंद काळे )
शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील एका प्रभागात अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली. पाणी घरात गेल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, माजी नगरसेवक बालाजी प्रकाश पाटील आगलावे यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी तत्काळ नगरपरिषदेची जेसीबी आणि मोबाईल व्हॅन घटनास्थळी बोलावून घेतली.
श्री. आगलावे यांनी स्वतः घटनास्थळी थांबून जेसीबीच्या साहाय्याने घरांमध्ये शिरणारे पावसाचे पाणी बाहेर काढले आणि पाण्याचा योग्य निचरा होईल याची व्यवस्था केली. त्यांच्या या तातडीच्या आणि प्रत्यक्ष सहभागामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
या मदतकार्यात त्यांना लहू वाळके, दत्ता भुरक पले, बळी पांचाळ, बळी तेलंगे यांच्यासह भागातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले. माजी नगरसेवकांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
