शिवनखेड येथील नुकसानग्रस्त शेतीची सभापती मंचकराव पाटील यांच्याकडून पाहणी
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील शिवनखेड येथे भेट देवून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांनी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची त्याचबरोबर विविध ठिकाणच्या लोकवस्तीची पाहणी केली. शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला.
सबंध जिल्हाभरात यापूर्वी अशी विदारक परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती. निसर्ग अक्षरशः कोपला आहे. नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. मुसळधार पावसाने आणि सततच्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेले सोयाबीन, तूर, मूग, कापूस, ऊस या पिकासह अनेकांच्या फळबागा पाण्यात गेल्या आहेत. शिवारातील पिकांचं होत्याचं नव्हतं झालं आहे.
हे अभूतपूर्व नुकसान असून शेतात जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर नदी-नाल्याकाठच्या आणि सखल भागातील अनेक वस्त्यांमधील घरात पाणी शिरून अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधताना सभापती मंचकराव पाटील म्हणाले की, “या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला आहे. शेतकरी संकटाच्या कचाट्यात सापडला आहे. जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा अशी आमची मागणी आहे. झालेल्या नुकसानपोटी सर्व शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी.”
यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेतकरी, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
