सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूरमध्ये पूरस्थितीवर नियंत्रण; ३ जणांना सुखरूप वाचवण्यात यश!

0
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूरमध्ये पूरस्थितीवर नियंत्रण; ३ जणांना सुखरूप वाचवण्यात यश!

​अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरस्थितीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे व तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने तत्काळ नियंत्रण मिळवले आहे. नदी-नाल्यांवरील पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलत संभाव्य धोका टाळण्यासाठी अनेक रस्त्यांवरील वाहतूक थांबवली असून, संपर्क तुटलेल्या गावांमध्ये पर्यायी मार्गांचा वापर सुरू केला आहे.
​या गंभीर परिस्थितीत, मन्याड नदीच्या पुरात अडकलेल्या तीन इसमांना सुखरूप वाचवण्यात पोलिसांच्या रेस्क्यू टीमला यश आले आहे.

​बचाव कार्य आणि प्रशासनाची भूमिका
​चिलखा येथे मन्याड नदीच्या पुरात अडकलेल्या तीन मजुरांची माहिती सकाळी ७.३० वाजता मिळताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. पोलीस मुख्यालय रेस्क्यू टीम, गावातील नागरिक, आणि अग्निशमन दलाच्या (अहमदपूर नगरपालिका) मदतीने दुपारी १.०० वाजता तिघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

​या बचाव कार्यात पोलीस कॉन्स्टेबल रियाज देशमुख आणि चिलखा येथील नागरिक नामदेव ज्ञानोबा माने यांनी मोलाची मदत केली. बचावलेल्यांमध्ये १) अल्ली कौसर (वय २३, रा. बिहार), २) रामकिशन भुजंग कांबळे (वय ४५, रा. जाम हिप्परगा, ता. मुखेड, जि. नांदेड), आणि ३) नंदकुमार शंकरराव वळसे (वय ५०, रा. मंगनाळ, ता. कंधार, जि. नांदेड) यांचा समावेश आहे.

​घटनास्थळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, आणि पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर हे स्वतः पोलीस स्टाफसह हजर राहून बचाव कार्यासाठी मदत करत होते.

​अहमदपूरमधील सद्यस्थिती आणि संपर्क तुटलेले रस्ते
​ उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक रस्त्यांवरील वाहतूक थांबवली असून, पर्यायी मार्गांची माहिती नागरिकांना दिली आहे. त्यांनी नागरिकांना पाण्याचा प्रवाह सुरू असलेल्या पुलावरून किंवा रस्त्यावरून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.

​संपर्क पूर्णपणे तुटलेले रस्ते आणि गावे:

​हाळी ते खरबवाडी (पर्यायी मार्ग नाही)
​सिदंगी खुर्द येथील पूल (पर्यायी मार्गही बंद)
​किनी कदू चा संपर्क तुटला आहे (सावरगाव थोट व मोघा दोन्ही मार्ग बंद)
​काळेगाव येथील पूल बंद (अहमदपूर-काळेगाव ते खंडाळी रस्ता बंद, पर्यायी रस्ता नाही)
​हगदळ येथील पूल बंद (हगदळ, वरवंटी, वरवंटी तांडा, रुई दक्षिण, जोतिबा तांडा, आंडगा, शिंदगी, गौडगाव यांसारख्या अनेक गावांचा संपर्क तुटला)
​पर्यायी मार्ग उपलब्ध असलेले रस्ते:

​कोळवाडी ते किनगाव रस्ता बंद, पण हिंगणगाव हून पर्यायी रस्ता सुरू.
​शिरूर आंबेगाव रस्त्यावर पाणी, परंतु पर्यायी रस्ता उपलब्ध.
​मोघा-अहमदपूर रस्ता बंद.
​माकणी-चोबळी रस्ता बंद, पण उमरगा ये – चापोली मार्गे पर्यायी रस्ता आहे.
​या पूरस्थितीमध्ये आपत्कालीन मदत आणि बचाव कार्य निरंतर सुरू आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!