अहमदपूर तालुक्यात पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर; शेतीचं मात्र मोठं नुकसान
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ) शुक्रवारची रात्र आणि शनिवार दुपारपर्यंत झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेली पूरपरिस्थिती अहमदपूर तालुक्यात सध्या पूर्वपदावर आली आहे. शनिवारी दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे नदी-नाले आणि तलावांची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे अनेक गावांचा तुटलेला संपर्क पुन्हा जोडला गेला असून, काही ठिकाणी पर्यायी रस्त्यांचा वापर सुरू झाला आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
पूर ओसरला असला तरी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सखल जमिनीतील पिके आजही पाण्याखाली आहेत.
सोयाबीनला मोड फुटले असून, कापसाची बोंडे कुजत आहेत.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी कपाशीची झाडे उन्मळून पडली आहेत.
नदी-नाल्यांच्या काठावरील जमिनीमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे शेतातील पिके भुईसपाट झाली आहेत.
वाहतूक आणि पर्यायी मार्ग
पूर परिस्थितीमुळे पाण्याखाली गेलेले पूल आणि रस्त्यांवर पडलेले खड्डे यामुळे काही गावांची वाहतूक अजूनही प्रभावित आहे, मात्र पर्यायी मार्गांनी दळणवळण सुरू झाले आहे.
शेनकुड येथील पूल पाण्याखाली: अहमदपूर-काळेगाव मार्गे खंडाळी जाणाऱ्या रस्त्यावरील शेनकुड येथील पूल अद्याप पाण्याखाली असल्याने टाकळगाव, सुमठाणा, वंजारवाडी, खंडाळी या गावांची वाहतूक बंद आहे. या गावांना उजना, गंगाहिप्परगा, बेंबडेवाडी मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध आहे.
थोळगा पुलाजवळ खड्डा: थोडगा येथील पुलाजवळ मोठा खड्डा पडल्याने मोघा, शिंदगी, तीर्थ, धानोरा, ब्रह्मवाडी या गावांची मोठ्या वाहनांसाठीची वाहतूक बंद आहे. हसरणी, जांब मार्गे मोठ्या वाहनांसाठी पर्याय रस्ता उपलब्ध करण्यात आला असून, दुचाकी वाहनांची वाहतूक मात्र चालू आहे.
एकंदरीत, रविवार, २८ सप्टेंबर रोजी तालुक्यात संपर्क तुटलेल्या सर्वच गावांशी दळणवळण काही ठिकाणी पर्यायी मार्गाने तर काहींना थेट रस्त्यावरून चालू झाले आहे.
नुकसानीचे पंचनामे लवकरच
या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे, पडझडीचे व अन्य नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदतकार्य सुरू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे.
