आजनी येथील बुद्ध विहारासाठी भरीव निधी देणार – सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील
शिरूर ताजबंद( गोविंद काळे ) अहमदपूर तालुक्यातील आजनी खुर्द येथील नियोजित वैशाली बुद्ध विहारासाठी भरीव निधी देणार असून, “आजनी गावाला शोभेल असे बुद्ध विहार आपण सर्वजण मिळून बांधू,” असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी केले.
आजनी खुर्द येथे वैशाली बुद्ध विहाराच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील बोलत होते. त्यांच्या हस्तेच या सोहळ्याचे भूमिपूजन संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भन्ते धम्म बोधीजी होते. यावेळी बोलताना नामदार पाटील म्हणाले की, आजनी आणि शिरूर या गावांसाठी माझ्या मनात वेगळेपण नाही. बौद्ध धर्माप्रती आदर व्यक्त करताना त्यांनी, “मी माझ्या मंत्रीपदाची शपथ नागपूर येथील दीक्षाभूमीला नमन करून घेतली होती,” अशी आठवणही सांगितली.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला माजी खासदार सुनील गायकवाड, माजी सरपंच साहेबराव जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, रिपाई नेते श्रीकांत बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी नगरसेवक भरत चामे, अहमदपूरचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, सरपंच डॉ. भालचंद्र चाटे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि सर्व बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर भालेराव यांनी केले तर बालाजी आचार्य यांनी सूत्रसंचालन केले.
